Wed, Jul 08, 2020 18:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कॅ. अमोल यादव यांचे विमान घेणार भरारी

कॅ. अमोल यादव यांचे विमान घेणार भरारी

Last Updated: Oct 21 2019 1:18AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मराठमोळा कॅप्टन अमोल यादव यांना नागरी हवाई उड्डाण संचालनालयाने स्वदेशी बनावटीच्या सहा आसनी विमानाच्या उड्डाणास सशर्त परवानगी दिली आहे. कॅप्टन यादव यांना रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बोलावून त्यांचे खास अभिनंदन केले आणि निवडणूक आयोगाच्या संमतीनंतर पंतप्रधान मोदी यांनी कॅप्टन यादव यांना प्रमाणपत्र प्रदान केले. 

कॅप्टन यादव यांनी जेट एअरवेजमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केले आहे. मूळचे सातारा येथील असलेल्या कॅप्टन यादव यांनी जेट एअरवेजमध्ये असतानाच सहा आसनी विमान बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. सहा वर्षांपूर्वी त्यांनी या दिशेने पहिले पाऊल टाकले. नागरी हवाई उड्डाण संचालनालयाकडे त्यांनी आपल्या ट्रस्ट एअरक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नोंद केली. त्यानंतर मुंबई येथे झालेल्या मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात त्यांनी या विमानाची प्रतिकृती सादर केली होती. 

नागरी हवाई उड्डाण संचालनालयाने त्यांच्या विमान उड्डाणाला परवानगी देताना काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार विमानाची ज्यावेळी चाचणी होईल त्यावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये. परीक्षण होण्याआधी एचएएल कंपनीत 15 दिवसांसाठी  प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागेल. त्यानंतर त्यांना एअर वर्थनेस हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. संचालनालयाकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असलेला अनुभव प्राप्त करण्याकरीता कॅप्टन यादव यांनी स्पाईस जेटमध्ये काही काळ काम केले. 

नोव्हेंबर 2017 मध्ये कॅप्टन अमोल यादव यांनी तयार केलेले विमान व्हीटी एनएमडी (नरेंद्र मोदी देवेंद्र) या कंपनीच्या नावाखाली नोंद केली. फेब्रुवारी 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने या कंपनीसोबत 19 आसनी विमान विविध टप्प्यांत बनवण्याचा सामंजस्य करार केला. सुमारे 35 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी पालघर येथे जागा देण्याचे ठरले. या प्रकल्पातून 10 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, अशी अपेक्षा कॅप्टन अमोल यादव यांनी व्यक्त केली होती.