Mon, May 20, 2019 22:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंडपासाठी परवानगी मिळणार 3 दिवसात 

मंडपासाठी परवानगी मिळणार 3 दिवसात 

Published On: Aug 24 2018 1:22AM | Last Updated: Aug 24 2018 12:58AMमुंबई : प्रतिनिधी 

गणेशोत्सव मंडळांना तातडीने मंडप परवानगी देण्यासाठी पालिका प्रशासनाने शनिवार व रविवार या साप्ताहिक सुटीदिवशी विभाग कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना येत्या तीन दिवसात मंडपाची परवानगी मिळणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केले. मात्र यासाठी गणेशोत्सव मंडळांनीही योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तातडीने मंडप परवानगी मिळावी यासाठी पालिकेने ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा प्रथमच उपलब्ध करून दिली आहे. वाहतूक पोलीस व शहर पोलिसांकडूनही याच अर्जाद्वारे परवानगी मिळणार आहे. पण अनेक मंडळे कागदपत्राची पूर्तता करत नसल्यामुळे त्यांना परवानगी देणे शक्य होत नसल्याचे पालिकेच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात गुरुवारी महापौरांच्या दालनात गणेशोत्सव समन्वय समिती पदाधिकार्‍यांंची बैठक संपन्न झाली. यावेळी शिवसेना नेते लिलाधर डाके, विनोद घोसाळकर, पालिका आयुक्त अजोय मेहता व पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना, महापौरांनी येत्या तीन दिवसात मंडपांना परवानगी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. 

मुंबईत 1 हजार 463 सार्वजनिक मंडळांपैकी 1 हजार 132 मंडळांनी मंडपासाठी अर्ज केले. यापैकी 527 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर उर्वरित मंडळांना परवानगी देण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. मंडपाची तातडीने परवानगी मिळावी यासाठी शनिवार व रविवारी पालिकेची विभाग कार्यालये उघडी ठेवण्यात येणार आहेत. मंडळांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी आपली कागदपत्रे तातडीने सादर करावीत, असे आवाहनही महापौरांनी यावेळी केले.