होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परप्रांतीयांनी मुंबईचा गौरव वाढवला : सीएम

परप्रांतीयांनी मुंबईचा गौरव वाढवला : सीएम

Published On: Dec 01 2017 9:36AM | Last Updated: Dec 01 2017 9:35AM

बुकमार्क करा

मुंबई : खास प्रतिनीधी

मुंबईचा गौरव उत्तर भारतीयांनी वाढवला, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा भाजपावर टीकास्त्र सोडले असून, मुख्यमंत्र्यांना आगामी काळात भय्याभूषण पुरस्कार मिळेल, अशा तिखट शब्दांचे ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. मनसेने गेल्या काही दिवसांपासून परप्रांतीयांविरोधातील आंदोलन पुन्हा सुरू केले असताना आता हा नवा वाद निर्माण झाल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

घाटकोपरच्या एका चौकाला शिक्षणमहर्षी आय. डी. सिंह यांचे नाव देण्याच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरभारतीयांनी मुंबईच्या उभारणीत दिलेल्या योगदानाचा उल्लेख करताना या शहराचा गौरव उत्तरभारतीयांनी वाढवला असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर मनसेचा पारा पुन्हा एकदा चढला असून आगामी काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण नाही, तर भय्याभूषण हा पुरस्कार नक्की मिळेल, असा चिमटा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी काढला आहे. नाना पाटेकर हे देखील भय्याभूषण पुरस्काराच्या स्पर्धेत सामील झाले आहेत, असाही टोमणा त्यांनी मारला आहे. गुजरात निवडणुकीच्या पोर्शभूमीवर मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्री अशी वक्तव्ये करीत असले, तरी त्यांनी कोणत्याही भाषेसाठी नव्हे, तर महाराष्ट्रासाठी काम करावे अशी अपेक्षा देशपांडे यांनी व्यक्त केली आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून शिकवणी घेतली पाहिजे, असे देशपांडे म्हणाले.