Sun, Jul 21, 2019 10:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पावसामुळे माणसे न मिळाल्याने रिक्षावरून काढली अंत्ययात्रा

पावसामुळे माणसे न मिळाल्याने रिक्षावरून काढली अंत्ययात्रा

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 17 2018 12:50AMनालासोपारा : वार्ताहर

गेल्या आठवड्यात वसई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंत्ययात्रेसाठी माणसे मिळाली नाहीत. त्यामुळे रिक्षेच्या टपावर मृतदेह ठेऊन रिक्षा पाण्यातून ढकलत मृतदेह स्मशानभूमीत न्यावा लागल्याची धक्कादायक घटना नालासोपार्‍यात घडली. संबंधित व्हीडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

नालासोपारा पाश्चिमेतील हनुमान नगर येथे राहणार्‍या राजकुमार जैस्वाल (40) यांचा 9 जुलैला अकस्मात मृत्यू झाला. या दिवशी तालुक्यात प्रलयंकारी पाऊस झाल्याने अंत्ययात्रेसाठी माणसे मिळाली नाहीत. तसेच रुग्णवाहिकेचीही व्यवस्थाही झाली नाही. 

रस्त्यांवर साचलेले पाणी, रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने जैस्वाल यांचे नातेवाईक तसेच आप्तेष्टही त्यांच्या अंत्ययात्रेला पोहोचू न शकल्याने त्यांच्या कुटुंबियांनी अखेर मृतदेह रिक्षेच्या टपावर ठेवून तुळींज स्मशानभूमीत नेला.