Sat, Jul 20, 2019 10:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन न्याय्यच

आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन न्याय्यच

Published On: Jun 16 2018 1:30AM | Last Updated: Jun 16 2018 1:25AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

आणीबाणीत लोकशाही वाचविण्यासाठी तुरुंगात गेलेल्या लोकांना पेन्शन देणे हे न्याय आहे. पेन्शन देताना या मिसाबंदींना आम्ही स्वातंत्र्यसैनिक म्हटलेले नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा या निर्णयाला विरोध चुकीचा असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील स्पष्ट केले. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आणीबाणीतील बंदींना पेन्शन देण्याच्या निर्णयावर केलेल्या टीकेबाबत बोलताना पाटील म्हणाले की, आणीबाणी विरुध्दच्या सत्याग्रहात एस.एम. जोशी, जयप्रकाश नारायण, भाई वैद्यांपासून पु.ल.देशपांडे यांच्यापर्यंत अनेकांनी सहभाग घेतला होता. लोकशाही वाचविण्यासाठी हा ऐतिहासिक लढा होता. 1975-77 काळात आलेल्या आणीबाणीमुळे लोकशाही हक्कांवर गदा आली होती. ही आणीबाणी योग्य होती का, हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने घोषित करावे, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले. 

आणीबाणी योग्य नव्हती हे मान्य करणार असतील तर त्यावेळी लढा दिलेल्या व 19 महिने तुरुंगात राहिलेल्या लोकांना मानधन देणे कसे चुकीचे आहे, हे त्यांनी सांगावे. त्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना मानधन देऊ नका हे कुठल्या न्यायात बसते, हे त्यांनी सांगावे. त्यावेळच्या लढ्यात स्वयंसेवकांनी आपली घरे उद्ध्वस्त करून सहभाग घेतला होता. त्यांचे नुकसान भरून न येणारे आहे. त्यामुळे त्यांना पेन्शन देणे न्याय असून त्यांना केलेली ती छोटीशी मदत आहे, असेही पाटील म्हणाले. 

आणीबाणीच्या चाळीस वर्षांनंतर अशी पेन्शन सुरू करण्यास अगोदरच उशीर झाला आहे. त्यामुळे ही पेन्शन सुरू करणे चुकीचे नाही. मुद्दे संपल्यामुळेच विरोधक या योजनेवर टीका करीत आहेत व आम्ही त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हटल्याचा संभ्रम पसरवित असल्याचे पाटील म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथे दोन मुलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर पाटील म्हणाले की, या घटनेमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला ते अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे असून ज्यांनी अन्याय केले ते भटक्या जमातीचे आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने खातरजमा न करता समाजामध्ये वितुष्ट निर्माण होईल, असे वक्तव्य करणे हे देशाच्या स्वास्थाच्या दृष्टीने योग्य नाही. राहुल गांधी यांनी ट्विटरवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये अन्यायग्रस्त मुलांचे चेहरे दिसतात. हे कायद्याच्या विरुध्द आहे, असे ते म्हणाले.

राहुल गांधींनी माफी मागावी

जळगाव येथे घडलेली घटना ही सवर्ण व अवर्ण यांमध्ये झालेली नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी याविषयी केलेले वक्तव्य निषेधार्ह असून त्यांनी सवर्णांची माफी मागावी, अशी मागणीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.