मुंबई : विशेष प्रतिनिधी
नाणार प्रकल्प हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. तो प्रकल्प राज्यातून जावा असे वाटत नाही. मात्र, स्थानिकांचा विरोध पहाता प्रकल्पाची जागा बदलण्याबाबत विचार होऊ शकतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त करीत नाणार प्रकल्पाच्या वादात शुक्रवारी उडी घेतली. ते 10 मे रोजी नाणार येथे भेट दिल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
नाणार प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने केंद्राने सौदीच्या आरमको कंपनीशी सामंजस्य करार केल्याने शिवसेना, भाजपमध्ये वाद पेटला आहे. शिवसेनेने मुख्यमंत्र्यांवर विश्वासघाताचा आरोप करतानाच हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी शरद पवार यांनीही या वादात उडी घेतली. नाणार येथील संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची त्यांच्या सिल्वरओक या निवासस्थानी भेट घेतली. हा प्रकल्प कोकणात होऊ नये, अशी भूमिका या ग्रामस्थांनी मांडली. त्यावर शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली नसली तरी या प्रकल्यासाठी अन्य जागेचा पर्याय तपासण्याबाबत सुतोवाच केले.
नाणार प्रकल्प हा केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. तीन लाख कोटी रुपयांचा हा हा प्रकल्प महाराष्ट्रातून जावा असे आपल्याला वाटत नाही. पण स्थानिकांचा विरोध पाहता प्रकल्पाची जागा बदलता येते का? यासाठी पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो. त्याबाबत आपण केंद्र आणि राज्य सरकारशी चर्चा करु. मात्र, आपण प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करु, असे शरद पवार म्हणाले. आपण 10 मे रोजी नाणारला भेट देणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी यापूर्वीच नाणार प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. मात्र, पवारांनी यापूर्वी कोकणातील एन्रॉन, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन केले होते. नाणार प्रकल्पाबाबतही पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे 10 मे रोजीच्या नाणार दौर्यात पवार काय भूमिका घेतात याविषयी उत्सुकता आहे.
Tags : Mumbai, Pawar, jump, nanar, project, debate