Mon, Aug 19, 2019 18:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेएनपीटीविरोधी आंदोलनात पवारांची मध्यस्थी

जेएनपीटीविरोधी आंदोलनात पवारांची मध्यस्थी

Published On: May 12 2018 1:48AM | Last Updated: May 12 2018 1:17AMनवी मुंबई: राजेंद्र पाटील 

जेएनपीटी प्रशासनाने घेतलेल्या निर्णया विरोधात 11 वाहतूकदार संघटनांनी तीन दिवसांपासून असहाकर आंदोलन पुकारल्याने 450 ते 500 कंटेनर शेतमालासह इतर जीवनाश्यक वस्तू लोडिंग करुन कोल्डस्टोरेजला उभे आहेत. परदेशात होणारी निर्यात पुर्णपणे ठप्प झाली आहे. याबाबत शुक्रवारी माजी कृषी मंत्री शरद पवार यांची एपीएमसी घाऊक व्यापार्‍यांनी भेट घेऊन माहिती दिली. आज शनिवारी सकाळी नवी  मुंबईत माजी मंत्री गणेश नाईक यांच्या व्हाईट हाऊसवर याबाबत महत्वपुर्ण बैठक पवारांच्या आदेशाने होत असून असहकार आंदोलन मिटण्याची दाट शक्यता आहे. दुपारी तीन वाजता  होणार्‍या या बैठकीस 11 वाहतूक संघटना, मनसेचे बाळा नांदगावकर, व्यापारी व शेकापचे नेते उपस्थित राहणार आहेत.

या आंदोलनाचा सर्वाधिक फटका एपीएमसी व्यापारी व निर्यातदारांना बसला असून आंदोलनावर तातडीने तोडगा काढण्याबाबत पवारांनी जेएनपीटी प्रमुख बन्सल यांना सांगितले. शुक्रवारी पवारांना भेटणार्‍या व्यापार्‍यांमध्ये  संजय पानसरे, बाळासाहेब बेंडे, किशोर दांगट आदींचा समावेश होता. यावेळी  पवार यांनी केंद्रीय जल मंत्री नितीन गडकरी आणि जेएनपीटीचे अध्यक्ष बन्सल यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन तातडीने आंदोलन मिटविणयाबाबत सांगितले.   

आंदोलनाचा परिणाम

 तीन दिवसात सुमारे 450 ते 500 कंटेनर माल भरून उभे 
 तीन दिवसात साडेनऊ कोटींचा व्यापार ठप्प
 कोकण हापूसचे मोठे नुकसान 
 नवी मुंबईतील सर्व 55 ते 60 कोल्ड स्टोरेज फुल्ल
 भाजीपाल्याचे भाव 25 ते 30 टक्क्यांनी गडगडले

निर्यात ठप्प

दररोज कांदा 2 हजार टन निर्यात होतो (मलेशिया, मॉरिशियस आणि आखाती देशात) 
भाजीपाला दररोज 300 टन निर्यात होतो (दुबई, मस्कत, कतार, सौदी अरेबिया, बहरीन )  
फळे दररोज 150 कंटेनर निर्यात होतात. (युरोप देशांमध्ये)
नवी मुंबईतील कोल्ड स्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात खजूर ठेवण्यात आला आहे. 17 जूनपासून रमजान सुरू होत असल्याने हा माल पाठविणे निर्यातदारांसाठी मोठी डोकेदुखी झाली आहे. सुमारे 8 ते 10 कोटींची खजूर असल्याचे सांगिण्यात आले.