मुंबई/ जाल खंबाटा : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी रविवारी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची होणारी भेट लांबणीवर पडली असून, ओघानेच शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारचा मुहूर्तदेखील पुढील चार दिवसांत निघण्याची चिन्हे नाहीत. नव्या सरकारच्या स्थापनेचे घोडे सोनियांप्रमाणेच पवारांसाठीही अडले, असे चित्र आहे.
शरद पवार यांनी रविवारीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात बोलावली आहे. त्यामुळे आधीच्या बातम्यांप्रमाणे पवार रविवारी दिल्लीला जाणार नाहीत. सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असल्याने पवार दिल्लीतच असतील. मात्र, सोमवारीदेखील ते काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी किंवा मंगळवारी पवार सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची भेट घेतील आणि त्यानंतर त्यांची सोनियांसोबत बैठक अपेक्षित आहे. ती कधी होणार, हे तूर्तास कोणीही सांगू शकत नाही.
सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांच्या संयुक्त बैठकीत किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला. त्यावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा होऊन अंतिम निर्णय अपेक्षित आहे. ही चर्चा रविवारी दिल्लीत होणार असल्याची चर्चा होती. शिवसेनेसह राज्याचे डोळे पवारांच्या दिल्ली भेटीकडे लागले होते. मात्र, पवारांनी राष्ट्रवादीची बैठक पुण्यात लावून नव्या सरकारची स्थापना पुन्हा ‘वेटिंग’वर ठेवली. तसे संकेत खरे तर पवारांनी शुक्रवारीच दिले होते. सत्तास्थापनेला थोडा वेळ लागणार असल्याचे ते नागपूर दौर्यात म्हणाले होते.
सत्तास्थापनेबद्दल राष्ट्रवादीमध्ये मतैक्य झाले असले, तरी काँग्रेसमध्ये तशी परिस्थिती नाही. शिवाय, राष्ट्रवादीतही संभाव्य सरकारमधील खातेवाटपावर चर्चा बाकी आहे. ती रविवारी कोअर कमिटीच्या बैठकीत पुण्यात होईल, असे सांगण्यात येते.
मुख्यमंंत्रिपदाचाही पेच
शिवसेनेला पाचही वर्षे मुख्यमंत्रिपद हवे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यात कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले असले तरी शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदावर अद्याप काही ठरले नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागा कमी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीलाही अडीच वर्षे तरी मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा आहे. तर, काँग्रेस सत्तेत येणार की बाहेरून पाठिंबा देणार याबाबतचा संभ्रम अजून कायम आहे.
सेनेचे हिंदुत्व पणाला?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के.अँटोनीसह अन्य ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाला काँग्रेसचे मतदार स्वीकारणार नाहीत, अशी मांडणी अँटनी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी केल्याने सोनिया गांधी दबावात आहेत. त्यामुळेच सेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडून द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे हिंदुत्व पणाला लागले आहे.