Sat, Jul 20, 2019 08:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवईचे मगर उद्यान अखेर मेट्रोखाली!

पवईचे मगर उद्यान अखेर मेट्रोखाली!

Published On: Apr 10 2018 1:37AM | Last Updated: Apr 10 2018 1:23AMमुंबई : प्रतिनिधी 

पवई तलावात मगरींसाठी स्वतंत्र उद्यान तयार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. पण ही कामे प्रस्तावित मुंबई मेट्रो 6 या प्रकल्पाने बाधित होत आहेत. यासाठी या उद्यानाच्या निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मगरी उद्यानाला मुकावे लागणार आहे. 

पवई तलाव क्षेत्र मगरी उद्यान म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी ऑगस्ट 2016 मध्ये काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केली होती. याबाबतचा ठरावही पालिका सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानुसार पालिकेने पवई तलावाचे संवर्धन करण्यासाठी पवई तलावाच्या पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी एरिशन व डी. ओ. मोनिटरिंग सिस्टीम बसवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पवई तलावात सोडण्यात आलेले सांडपाणी थांबवण्यासाठी मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतण्यात आला असून ही कामे सुरूही झाली. डिसेंबर 2016 मध्ये मगरीसाठी स्वतंत्र उद्यान उभारण्याची वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक पार पडली होती. यावेळी मगरींसाठी तलावात विशेष क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली. पण ही कामे प्रस्तावित मुंबई मेट्रो 6 या प्रकल्पात येत असल्यामुळे मगरी उद्यानाचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. दरम्यान पवई तलावात होणार्‍या अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले. 

Tags : Mumbai, Mumbai news, Pavement crocodile garden, After all down the metro,