राज्यात रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५%

Last Updated: Jun 04 2020 1:17AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, बुधवारी आणखी 1276  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. बुधवारी राज्यातही तब्बल 2560 नवीन रुग्ण झाल्याने एकूण रुग्णसंख्या 74 हजार 860 झाली आहे. राज्यात आणि मुंबईत दिवसाला हजारहून अधिक रुग्ण सापडत असले तरी राज्य पातळीवर रुग्णवाढीचा दर हा 7 टक्क्यांवरून 4.5 टक्क्यांवर आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगिलते. 

मुंबईत दिवसभरात एकूण 49 जणांचा मृत्यू झाला असून 259 रुग्ण बरे होऊन घरी परतले. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये 27 रुग्ण 60 वर्षांवरील होते. मुंबईत दररोज सरासरी एक हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 43,492 पर्यंत पोहोचली आहे.

राज्यात आज 996 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 32 हजार 329 रुग्णांना घरी सोडण्यात आले, तर सध्या राज्यात 39 हजार 935 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली. 

1 मे ते 1 जून या कालावधीत राज्यातील रुग्णवाढीचा वेग क्रमशः कमी होत असून दि.1 जून रोजी तो देशाच्या सरासरीपेक्षा ( 4.74 टक्के ) देखील कमी झाला आहे. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरून राज्यातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते, असे टोपे यांनी सांगितले.