Thu, Apr 25, 2019 18:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पॅसेंजर रोखली अन् दूध नाही म्हणून सोडली

पॅसेंजर रोखली अन् दूध नाही म्हणून सोडली

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 19 2018 1:32AMडहाणू : वार्ताहर

दूधबंद आंदोलनाच्या काळात गुजरात आणि कर्नाटकचे दूध राज्यात येऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी डहाणू रेल्वे स्थानकावरील रेलरोको दरम्यान दिला. शेट्टी यांनी  अहमदाबाद -मुंबई सेंट्रल पॅसेंजर यावेळी रोखली खरी मात्र, या रेल्वेला दुधाचा डबाच नव्हता. 

अहमदाबाद -मुंबई सेंट्रल पॅसेंजरने गुजरातवरून सुमारे 4  लाख लिटर दूध मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि कार्यकर्ते बुधवारी सकाळपासून डहाणू रोड रेल्वे स्थानकावर तळ ठोकून होते. पॅसेंजर रेल्वे स्थानकावर येताच स्वाभिमानी कार्यकर्ते रूळांवर उतरले. मात्र, पॅसेंजरला दूधाचे टँक जोडले नसल्याचे लक्षात येताच ही गाडी आंदोलकांनी सोडून दिली. सरकारने आंदोलनाच्या भीतीनेच पॅसेंजरला दुधाचे टँकर जोडले नाहीत, हा शेतकर्‍यांचा विजय आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील, असे जाहीर करत शेट्टी बोईसरकडे रवाना झाले.

संपाचा पालघरमध्ये परिणाम नाही

वसई : पालघर जिल्ह्यात दुधाचे चांगले उत्पादन होत असल्याने दुधाचा तुटवडा जाणवत नाही. तसेच वितरण व्यवस्थेवरही कोणताही परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात विरार येथे अमूल, वसई-कामण येथे अन्य 20 ते 25 मोठे गोठे आहेत. ग्रामीण भागात स्थानिकांचेही छोटेखानी गोठे असल्याने या संपाचा जिल्ह्यात फारसा परिणाम जाणवला नाही.