Mon, Jul 22, 2019 13:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपच्या शतप्रतिशतचे काय?

भाजपच्या शतप्रतिशतचे काय?

Published On: Jan 25 2018 1:48AM | Last Updated: Jan 25 2018 1:39AMमुंबई : खास प्रतिनिधी

अगदी पूर्वीपासून युती असतानाच भाजपाने शतप्रतिशतची घोषणा दिली होती, मग आता शिवसेनेने स्वबळाची भाषा केली, तर त्यात काय गैर आहे? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. कालच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर मीडियातून झालेल्या टिकेमुळे आज शिवसेनेने सामनातून भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने यापुढच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव मंजूर केला, आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नितीन गडकरी आणि अन्य भाजपा नेत्यांवर टिकेचे प्रहार केले होते. उद्धव यांच्या या भाषणानंतर सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवरील चचार्ंमधून शिवसेना टिकेचे लक्ष्य झाली. सत्तेत राहून सेनेने अशी भूमिका घेऊ नये असा सूर या टिकेचा होता. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. 

भाजपाने शतप्रतिशतचा नारा याआधीच दिला आहे. प्रमोद महाजन यांनी अनेक वर्षांपूर्वी ही गर्जना केली. मात्र काय हो प्रमोदजी, आपली तर शिवसेनेबरोबर युती आणि मैत्री आहे. महाराष्ट्रात व देशातील सत्तेत तुम्ही साथ साथ आहात. तरीही शिवसेनेस टांग मारून शतप्रतिशतचा नारा देणे हा काय प्रकार? असे प्रमोद महाजन यांना कुणी विचारले नव्हते, असले दळभद्री प्रश्न शिवसेनेच्याच वाट्याला येत राहिले, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

लोकसभेच्या 380 जागा जिंकण्याचा अश्वमेधी घोडा फिरवायला भाजपाच्या  राष्ट्रीय अध्यक्षांनी आतापासूनच सुरुवात केली आहे. भाजपासोबत जे एनडीएचे घटक पक्ष आहेत त्यांना टांग मारूनच 380 चा गनिमी कावा खेळला जात असेल तर शिवसेनेने लोकसभा, विधानसभेचे स्वबळी रणशिंग फुंकले तर इतकी भिरभिरी यायचे कारण काय?, असा सवाल शिवसेनेने भाजपाला विचारला आहे.

शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल तर 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा तयार असून यात नुकसान झाले तर ते शिवसेनेचेच होईल, या भाजपा नेत्यांच्या वक्तव्याला उत्तर देताना आम्हाला राजकीय नफ्या-तोट्यांची चिंता कधीच वाटली नाही. शिवाजी महाराजांनी तेव्हाच्या सरदार, जहागिरदारांचा विरोध पत्करूनही आपले कार्य पुढे नेले. शिवसेनाप्रमुखांनादेखील शिवाजी राजांप्रमाणेच विरोध झाला आणि त्याच विरोधाची शिदोरी आमच्याही हाती पडली आहे. संकटांची व अडथळ्यांची पर्वा आम्हाला नाही, असे या अग्रलेखात म्हटले आहे. महाराष्ट्राचे खायचे व कानडी मुलखात जन्मास येण्याचे स्वप्न पाहणार्‍यांची अवलाद शिवसेनेची नाही, असा टोलाही शिवसेनेने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.