Sun, Feb 17, 2019 23:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता वाघाला गोंजारून उपयोग नाही : उद्धव

आता वाघाला गोंजारून उपयोग नाही : उद्धव

Published On: Apr 10 2018 1:21AM | Last Updated: Apr 10 2018 1:21AMमुंबई : खास प्रतिनिधी

शिवसेनेचा वाघ हा पिंजर्‍यातला वाघ नाही, त्यामुळे आता त्याला भाजपने कितीही गोंजारले किंवा रोखले तरी ते शक्य नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा युतीचा प्रस्ताव झिडकारला आहे. ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातूनही भाजपच्या धोरणांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

भाजपच्या स्थापना दिन मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेचा खास उल्लेख करीत आगामी काळात युती करण्याची भाजपची इच्छा असल्याचे संकेत दिले होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर युतीची प्राथमिक चर्चा करण्यासाठी 14 एप्रिलला उद्धव ठाकरे यांना भेटण्याचे जाहीरदेखील करून टाकले आहे.

भाजप अजूनही 2014 च्या सुवर्णकाळात रमलेला असला, तरी 2019 चे चित्र पूर्ण वेगळे असेल, हे त्यांनी लक्षात घ्यावे, अशा कानपिचक्या देताना भाजप मजबूत आणि स्वयंभू असल्याचा चिमटा उद्धव यांनी काढला आहे. शिवसेनेने सोबत असावे, असे त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उडत उडत सांगितले असले, तरी 2014 मध्ये त्यांना हा सद्विचार सुचला नाही आणि सत्ता मिळाल्यावरही ते विनय हरवून बसले. त्यांचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे. आता उतरवायचे म्हटले तर त्यासाठी जमीन नाही, असा टोमणा लगावताना सुवर्णकाळातील सुवर्ण कौले फूलपूर-गोरखपूरमधून उडून गेल्यावर काही गोष्टी सुचू लागल्या असल्याचा टोलादेखील मारण्यात आला आहे.

Tags : Mumbai, Mumbai news, Party chief Uddhav Thackeray, rejected, BJP, alliance proposal,