Tue, Mar 19, 2019 20:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परिचारकप्रकरणी सेनेचा सभात्याग

परिचारकप्रकरणी सेनेचा सभात्याग

Published On: Mar 07 2018 2:08AM | Last Updated: Mar 07 2018 1:47AMमुंबई : प्रतिनिधी

सैनिकांच्या पत्नींबद्दल अवमानकारक वक्‍तव्य करणारे विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांना संपूर्ण काळासाठी बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पुन्हा एकदा करून शिवसेनेने मंगळवारी विधानसभेत जोरदार गदारोळ केला. त्यावर सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने सेनेच्या आमदारांनी सभात्यागही केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांनीही हीच भूमिका घेतल्याने सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. अखेर परिचारक यांनी केलेल्या विधानाचे समर्थन होऊच शकत नाही. मात्र, विधान परिषदेत निर्णय झाल्यानंतरच सरकारकडून विधानसभेत निवेदन करू, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

प्रशांत परिचारक यांनी सैनिक पत्नींबाबत केलेल्या विधानाचे जोरदार पडसाद गेले दोन दिवस दोन्ही सभागृहांत उमटत आहेत. विधान परिषदेत तर परिचारक यांना बडतर्फ करावे, असा ठराव शिवसेनेने दाखल केला आहे. आज विधानसभेतही हाच विषय शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला. सरकारची त्यांच्याबद्दल काय भूमिका आहे, हे स्पष्ट करण्याची मागणी सरनाईक यांनी केली. त्यांच्या या मागणीला काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठिंबा दिला. राज्याचे लक्ष लागलेल्या या गंभीर विषयावर सरकार काय निर्णय घेणार, याकडे जनता पाहत आहे, असे चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनीही सरकारने याप्रश्‍नी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.

शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी, यावेळी परिचारक यांचे वक्‍तव्य हे सीमेवरील जवानांचे मनोधैर्य खच्ची करणारे आहे. त्यांना बडतर्फ करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकारने याबाबत खुलासा करावा, असे निर्देश दिले.

संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी दिवसाचे कामकाज संपण्याआधी खुलासा करू, असे आश्‍वासन दिले. मात्र, त्यामुळे समाधान न झालेल्या शिवसेनेच्या आमदारांनी अधिकच आक्रमक होत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी केली आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप करत सभात्याग केला.

परिचारक यांचे वक्‍तव्य निषेधार्हच आहे. त्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊच शकत नाही. मात्र, परिचारक यांच्याबाबतीत विधान परिषदेत निर्णय होणार आहे. त्यानंतर विधानसभेत निवेदन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.