Sat, Jul 20, 2019 02:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परिचारक निलंबन प्रकरण : विधान परिषदेत गोंधळ

परिचारक निलंबन प्रकरण : विधान परिषदेत गोंधळ

Published On: Mar 06 2018 1:50AM | Last Updated: Mar 06 2018 12:56AMमुंबई : प्रतिनिधी

देशाच्या सीमेवर लढणार्‍या जवानांच्या कुटुंबीयांचा अपमान करणार्‍या आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याचा मुद्दा एका विशिष्ट विचारधारेशी जोडत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत केला. त्यावर सभागृहनेते महसूलमंत्री चंंद्रकांत पाटील यांनी वारंवार हा विषय विचारधारेशी जोडू नका. सभागृहात हे काय सुरू आहे? असे विचारत आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला, काही केल्या ते शांत होत नसल्याने सुरुवातीला दहा मिनिटे आणि त्यानंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

शिवसेना गटनेते अ‍ॅड. अनिल परब यांनी परिचारक यांनी केलेले वक्‍तव्य हे देशाच्या सीमेवर लढणार्‍या जवानांचा अपमान करणारे आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेतले, तर सभागृहाला शहिदांचा अपमान मान्य आहे, असा समज होईल. कायद्यापेक्षा भावना महत्त्वाची असल्याचे सांगत, हा विषय नियम व कायद्याच्या कचाट्यात अडकवू नका. तर यासंदर्भात प्रथा आणि परंपरेनुसार निर्णय करून परिचारक यांना बडतर्फ करा, अशी मागणी केली. नीलम गोर्‍हे यांनी त्यास पाठिंबा दिला. या विषयासंदर्भात नियुक्‍त केलेल्या समितीमध्ये निलंबन मागे घेण्याबाबत एकमताने ठराव झालेला नाही. ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

परिचारक यांच्यासंदर्भात परब यांनी मांडलेल्या प्रस्तावाचे समर्थन करताना कपिल पाटील यांनी, निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव एकमताने पारित झाला, असा समज झालेला आहे. मात्र, मी नम्रपणे नोंदवू इच्छितो की, तो एकमताने पारित झालेला नसून, यासंदर्भातील अहवालाला आपली व्यक्‍तिश: संमती नसल्याचे स्पष्ट केले. परिचारकांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सभागृहात बोलावणे ही घातक परंपरा सुरू होईल. त्यांनी जे शब्दप्रयोग केले, ती परंपरा या देशामध्ये ज्यांची आहे ते सत्तेवर असतील, तर प्रश्‍न अधिक गंभीर बनतो, असे सांगत ते जे बोलले ते माफ करण्यालायक आहे की नाही, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी केली.