Tue, Apr 23, 2019 21:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अग्निसुरक्षेची जबाबदारी रहिवाशांची!

अग्निसुरक्षेची जबाबदारी रहिवाशांची!

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 24 2018 12:38AMमुंबई : प्रतिनिधी

परळच्या क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीप्रकरणी विकासक अब्दुल रझ्झाक इस्माईल सुपारीवाला याला भोईवाडा पोलिसांनी बुधवारी रात्री अटक करून गुरुवारी कोर्टात हजर केले. इमारतीच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी इमारतीत राहणार्‍या रहिवाशांची आहे, असा अजब दावा आगीप्रकरणी अटकेत असलेला सुपारीवाला याने कोर्टात केला. मात्र भोईवाडा न्यायालयाने त्याला 27 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

क्रिस्टल टॉवर बांधून झाल्यानंतर 2012 सालापासून आम्ही इमारतीमधील रहिवाशांना सोसायटी स्थापन करण्यास सांगत आहे. तरीही त्यांनी सोसायटी स्थापन का केली नाही, सोसायटी स्थापन करुन लोकांनी अग्निसुरक्षीततेचा प्रश्‍न सोडविणे  गरजेचे होते, त्यामुळे सर्व जबाबदारी नागरिकांची असल्याचे सांगून विकासकाने आपली जबाबदारी झटकली. 2012 पासून आम्ही ओसी आणि अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करत आहोत. मात्र तरी देखील आम्हाला महापालिका ओसी का देत नाही, असेही विकासकाकडून कोर्टात सांगण्यात आले.                    

या प्रकरणी अग्निशमन दलाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसतानाही हे फ्लॅट विकल्याचा आरोप केला आहे. तसेच या इमारतीत आग विझवण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना कार्यान्वित नव्हती, असेही सरकारी वकिलांकडून कोर्टाला सांगण्यात आले. या इमारतीच्या आठव्या मजल्यावर एक अनधिकृत बांधकाम होते. एका अनधिकृत बांधकामावर बीएमसीने हातोडा चालवला होता, अशीही माहिती यावेळी कोर्टाला देण्यात आली. बेकायदा बांधकामामुळे इमारत राहण्यासाठी धोकादायक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तसंच याप्रकरणी सुपारीवाला याचे इतर सहकारी यात सहभागी होते का? याचा तपास करून जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली.

मृतांना न्याय मिळायला हवा. तसेच डीसी रेग्युलेशनखाली गुन्हेगारी अ‍ॅक्टनुसार त्याच्या आधारे कारवाई करण्यात यावी. तसेच आमच्या येथे अनधिकृत बांधकाम नाही. विकासकाची कसून चौकशी करण्यात यावी. तसेच इमारतीचे पाणी ,वीज तोडण्यात आली नसल्याची माहिती अनिल काळे या स्थानिक नागरिकाने दिली.                

परळ-हिंदमाता परिसरातील 17 मजली क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली होती. या आगीमध्ये चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर 23 रहिवाशी जखमी झाले होते. अग्निशमन दलाचे 5 जवान जखमी झाले. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.