Wed, Jun 26, 2019 11:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचाही समांतर तपास

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचाही समांतर तपास

Published On: Sep 03 2018 1:40AM | Last Updated: Sep 03 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी

नालासोपारा शस्त्रसाठ्याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या पाचही आरोपींसह सीबीआयने अटक केलेल्या आरोपींकडे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणीही तपास यंत्रणा समांतर आणि कसून तपास करत आहेत. 

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यासह त्यांच्यावर, पत्नीवर दोन मारेकर्‍यांनी 16 फेब्रुवारी 2015 रोजी गोळ्या झाडल्या होत्या. गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांच्यावर कोल्हापुरमधील उपचारांनंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये आणले होते. उपचारांदरम्यान 20 फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले होते. याप्रकरणी विशेष तपास पथक तपास करत आहे. या गुन्ह्यात आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, यासाठी सीबीआयने त्यांच्या कोठडीतील अंदुरेकडे कसून चौकशी केल्याची माहिती मिळते.  

नालासोपारा शस्त्रसाठ्याप्रकरणी आरोपी वैभव राऊत याच्यासह शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर यांची कोठडी संपत असल्याने एटीएस त्यांना सोमवारी विशेष सत्र न्यायालयासमोर हजर करणार आहे. यावेळी एटीएस सर्वांसाठी वाढीव कोठडीची मागणी करेल. कळस्करच्या ताब्यासह कोठडीच्या मागणीसाठी सीबीआयसुद्धा न्यायालयात हजर राहाणार आहे.