Thu, Jun 27, 2019 01:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पनवेल आयुक्त शिंदेंवर सरकारचा अविश्‍वास

पनवेल आयुक्त शिंदेंवर सरकारचा अविश्‍वास

Published On: Apr 17 2018 2:26AM | Last Updated: Apr 17 2018 2:10AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची अखेर बदली झाली असून त्यांची महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी झालेला वाद त्यांना नडल्यामुळे ही बदली झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्ह्याधिकारी सौरव राव हे आता पुणे महापालिकेचे आयुक्त असतील. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची बदली औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. 

राज्य प्रशासनामध्ये फेरबदलाला सुरुवात झाली असून सोमवारी बदल्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. सुधाकर शिंदे यांचा ठाकूर पिता-पुत्रांशी वाद निर्माण झाला होता. या वादातून त्यांच्याविरोधात महापालिकेत अविश्‍वास ठराव आणण्यात आला होता. मात्र, तो मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे शिंदे पनवेल महापालिकेतच रहातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांकडे असलेले राजकीय वजन भारी पडल्याने शिंदे यांची बदली झाल्याची चर्चा आहे. 

औरंगाबाद महापालिकेत कचरा प्रकरण राज्यभर गाजले होते. मूळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील असलेले आणि धडाडीचे अधिकारी अशी ओळख असलेल्या सुनील चव्हाण यांच्याकडे आता या प्रश्‍नावर तोडगा काढण्याची जबाबदारी असेल. तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. 

नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांची विक्रीकर सहआयुक्त म्हणून बदली झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांची परिवहन आयुक्तपदी, रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

Tags : Mumbai, Panvel Commissioner Shinde, government disbelief, Mumbai news,