Mon, Jun 17, 2019 14:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंकज भुजबळांनी उद्धव यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण

पंकज भुजबळांनी उद्धव यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण

Published On: May 09 2018 9:10PM | Last Updated: May 09 2018 7:58PMमुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे  पुत्र आमदार पंकज भुजबळ यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या बातमीने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी पंकज यांना छगन भुजबळांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तर छगन भुजबळ हे  दि. 10 जून रोजी  पुण्यात होणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोपात भाषण करणार असल्याचे वृत्त आहे.

मनी लाँडरिंग प्रकरणात छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर दोन वर्षाहून अधिक काळ ते तुरुंगात  होते. जामीन मिळविण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही त्यांना जामीन मिळाला नव्हता.  दि. 4 मे रोजी  त्यांची जामिनावर सुटका झाली असून, ते केईएम हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत. तांत्रिकदृष्ट्या त्यांची मुक्‍तता झाली असली तरी ते उपचारामुळे अद्याप बाहेर आलेले नाहीत. दि. 14 मार्च 2016 रोजी भुजबळ यांना सक्‍तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी पाचारण  केले होते. 11 तास त्यांची चौकशी करून रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, भुजबळ यांची मुक्‍तता झाल्यानंतर काही राजकीय नेत्यांनी त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.  त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असतानाच अचानकपणे पंकज भुजबळ यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे  दोन्हीकडून सांगण्यात येत असले, तरी या भेटीने राजकीय वर्तुळातील भुवया उंचावल्या आहेत. ‘मातोश्री’वरील 15 मिनिटांच्या या भेटीत मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.  या भेटीत पंकज भुजबळ यांना वडिलांच्या तब्येतीची काळजी घे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

Tags : Pankaj Bhujbal, met, Shiv Sena chief Uddhav Thakre,