Wed, May 27, 2020 03:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संतूरवादक पं. उल्हास बापट यांचे निधन

संतूरवादक पं. उल्हास बापट यांचे निधन

Published On: Jan 05 2018 2:01AM | Last Updated: Jan 05 2018 2:01AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

महान संगीतकार पंचमदा म्हणजेच आर. डी. बर्मन यांच्या अनेक गाजलेल्या गाण्यांना संतूरसाज चढवणारे ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे गुरुवारी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. पंचमदा यांच्या पुण्यतिथी दिनीच त्यांनी निरोप घेतला.

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सुन, नातवडे असा परिवार आहे. दादर येथील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन महिन्यापूर्वी जमशेदपूर येथे एका कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर ते आजारीच होते.माहिम येथील हिंदूजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.मुत्रपिंडाच्या विकाराने त्यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले.पंडित उल्हास बापट यांचा जन्म 31 ऑगस्ट 1950 रोजी झाला. त्यांचे वडील माजी पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट हे एक उत्तम गायक होते.

वयाच्या पाचव्या वर्षीच मुलाचा संगीताकडे असलेला कल त्यांनी लक्षात घेतला व त्यांना पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे तबल्याच्या शिकवणीसाठी पाठविले. पुरेसे तबला शिक्षण झाल्यावर उल्हास बापट यांनी आपल्या वडिलांकडे गायनाचे प्राथमिक धडे घेतले. त्याच काळात ते प्रसिद्ध सरोदवादक झरीन दारूवाला यांच्या संपर्कात आले. झरीन दारूवाला यांच्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे आणि वामनराव सडोलीकर यांना गुरू केले आणि रागशास्त्र, बंदिशी आणि खयाल गायनाचे शिक्षण घेतले. इतक्या विविध अनुभवांनंतर उल्हास बापट संतूरवादनाकडे वळले. ते जगातील उत्कृष्ट वादकांपैकी एक होते.

संतूरच्या तारा जुळविण्यासाठी क्रोमॅटिक सिस्टिम वापरणारे ते एकमेव वादक होते. मराठी, हिंदी चित्रपटांतील अनेक गीतात त्यांचे संतूरवादन होते. सन 1978 मध्ये घर या चित्रपटाच्या संगीतासाठी संतूरवादन करून त्यांनी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. आर.डी. बर्मन यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. त्यानंतर पंचमदा आणि उल्हास बापट यांची घट्ट मैत्रीच जमली. पुढे पंचमदांच्या अनेक अजरामर गाण्यांच्या संगीतात त्यांच्या संतूरचे सूर गुंजले. आशा भोसले यांच्या ऋतु हिरवा या अल्बममध्येदेखील त्यांच्या संतूर वादनाचा वापर झाला आहे.

मराठीत जैत रे जैत, हिंदीतील इजाजत, 1942 ए लव्ह स्टोरी, वीरझारा, फना, ओम शांती ओम, फॅशन अशा अनेक चित्रपटांच्या संगीताला त्यांनी संतूरची साथ केली. बापट यांनी 1988 पासून कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंडचे दौरे केले. पंडित नारायण मणी यांच्याबरोबर उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे इन कस्टडी अ‍ॅन्ड कॉन्व्हरसेशन्स या नावाचे दोन अल्बम प्रकाशित झाले आहेत.