Tue, Mar 19, 2019 03:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पॅनक्‍लबच्या ६ संचालकांविरुद्ध गुन्हा

पॅनक्‍लबच्या ६ संचालकांविरुद्ध गुन्हा

Published On: Dec 14 2017 2:05AM | Last Updated: Dec 14 2017 1:59AM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

महानगरातला सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असलेल्या पॅनकार्ड क्‍लबची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केली असून कंपनीच्या सहा संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
या घोटाळ्यात सुमारे 50 लाख गुंतवणूकदारांना जवळजवळ 7 हजार 35 कोटींना फसवण्यात आले आहे. 

याआधी पॅनक्‍लबने आपली कोणतीही मालमत्ता विकू नये यासाठी सेबीने ताकीद दिली आहे. त्याचबरोबर कंपनीच्या ठिकठिकाणच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्या विकून त्याद्वारे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या हेतूने सेबीने निवृत्त न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. दरम्यान या कंपनीचे प्रभादेवी येथे असलेले मुख्यालय बंद असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

विविध शहरांमध्ये हॉटेल वास्तव्याची सोय उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली कंपनीने सभासदनोंदणी सुरू केली. त्याचबरोबर सभासदांनी या योजनेत गुंतवणूक करावी अशाही सूचना केल्या. लाखो गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपये गुंतवले. मात्र ज्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळेल अशी आशा दाखवण्यात आली होती त्यांची मात्र पूर्णतः निराशा झाली. त्यांना कबूल करण्यात आलेली सुविधा मिळालीच नाही. असे प्रकार वाढीस लागले त्यानंतर काही गुंतवणूकदारांनी सेबीकडे यासंदर्भात तक्रार केली. सेबीने त्याची तात्काळ दखल घेऊन चौकशी सुरू केली. अशा प्रकारची गुंतवणूक करायची असेल तर सेबीची परवानगी घ्यावी लागते पण पॅनक्‍लबने अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. 

सेबीच्या चौकशीत केवळ एक टक्‍का गुंतवणूकदारांनाच पॅनक्‍लबच्या योजनेचा लाभ मिळाल्याचे उघड झाले. त्यामुळे सेबीने कंपनीच्या व्यवहारांवर निर्बंध लादत हा व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. कोणत्याही नवीन ठेवी स्वीकारायच्या नाहीत. तसेच गुंतवणूकदारांच्या ठेवी तीन महिन्यांच्या आत परत कराव्यात, मालमत्ता विकू नयेत,असेही सांगितले. मात्र त्याला पॅनक्‍लबने सिक्युरिटी अपीलिट ट्रायब्युनलकडे धाव घेत आव्हान दिले. मात्र तिथे ट्रायब्युनलने सेबीचे आदेश कायम ठेवले. 

पॅनक्‍लबच्या 34 ठिकाणच्या मालमत्ता सेबीने ताब्यात घेतल्या आहेत तर 250 बँक खाती गोठवली आहेत. ताब्यात घेतलेल्या मालमत्तांमध्ये देशभरातील मोकळ्या जमिनी इमारती, कार्यालये आणि रिसॉर्टस् यांचा समावेश आहे. 

10 डिसेंबर रोजी दादर येथील रहिवासी नरेंद्र वाटुकर यांनी आपली 40 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दादर पोलीस स्थानकात दाखल केली आहे. त्याचबरोबर 82 इतर गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे अशाच प्रकारच्या तक्रार नोंदवल्या आहेत. त्यानंतर या शाखेने चौकशी सुरू केली आहे. पॅनक्‍लबमध्ये गुंतवणूक करणार्‍यांमध्ये बहुतांशी मध्यमवर्गीय कुटुंबे आहेत.