Mon, May 20, 2019 08:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर पोटनिवडणुकीत मतदारांचा निरुत्साह

पालघर पोटनिवडणुकीत मतदारांचा निरुत्साह

Published On: May 29 2018 2:14AM | Last Updated: May 29 2018 2:13AMपालघर / सफाळे : वार्ताहर

महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि राज्याचा आगामी राजकीय पट बदलून टाकणार्‍या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी 46.50 टक्के मतदान झाले. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन ठिकठिकाणी बंद पडण्याच्या घटना, प्रचंड उकाडा तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीसह मतदारांनी दाखवलेला निरुत्साह मतदानावर जाणवला. मतमोजणी 31 मे रोजी सकाळी 8 वा. गोडाऊन क्र.2, सूर्या कॉलनी येथे सुरू होणार आहे.

पोटनिवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, बविआचे बळीराम जाधव, काँग्रेसचे दामोदर शिंगडा आणि माकपचे किरण गहला हे पाच उमेदवार रिंगणात होते. भाजपला पाठिंबा दिलेल्या निलेश सांबरे यांच्या  गाडीवर झालेली कथित दगडफेक, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची पोलिसांशी झालेली शाब्दिक चकमक आणि मतदान करून घरी परतताना महिलेचा उष्माघातामुळे झालेला मृत्यू ही मतदानादिवशीची वैशिष्ट्ये ठरली. निवडणूक यंत्रणा भाजपसाठीच राबत होती असा आरोप बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी केला.

आ.प्रवीण दरेकरांना अडवले

पालघर लोकसभा निवडणुकीसाठी पालघरमध्ये विविध पक्षांचे आमदार तळ ठोकून होते. दरम्यान, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांना चारोटी येथे पोलिसांनी अडवून मतदारसंघात फिरण्यास मनाई केली. यावेळी दरेकर आणि पोलिसांची शाब्दीक चकमक झाली.

निवडणूक यंत्रणा भाजपच्या दावणीला : हितेंद्र ठाकूर

स्थानिक भाजप कार्यकर्ते मतदारांच्या अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था करण्यासाठी हौसिंग सोसायट्यांना फ ोन करत होते, असा आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला. बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी मुद्दामहून ईव्हीएम बंद ठेवल्या, तसेच येथील मतदान आम्हाला होऊ नये असा आटोकाट प्रयत्न भाजपने केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

टेेंभोडेत मतदार मतदान न करताच माघारी

पालघर मधील टेंभोडे तसेच अन्य बूथ मधील मशीन बंद पडल्यामुळे अनेक मतदार कंटाळून मतदान न करताच निघून गेले.

मतदान करून घरी परतताना महिलेचा मृत्यू

डहाणू : डहाणू तालुक्यातील सोनाळे, पाटीलपाडा जिल्हा परिषद शाळेत मतदान करून घरी परतणार्‍या शंती बापजी चौरे (60) या आदिवासी महिलेचा सकाळी 11. वा. उष्माघातामुळे मृत्यू झाल्या. त्या रस्त्यावरून घरी जात असतानाच अचानक उलटी येऊन कोसळून मरण पावल्या.