Fri, Apr 26, 2019 19:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरमध्ये एका रात्रीत वाढली ८२ हजार मते!

पालघरमध्ये एका रात्रीत वाढली ८२ हजार मते!

Published On: May 31 2018 1:42AM | Last Updated: May 31 2018 1:42AMवसई : प्रतिनिधी

अगदी अर्ज भरण्यापासून ते जहाल प्रचारापर्यंत कायम चर्चेत राहिलेली पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता निकालातही गाजण्याची चिन्हे आहेत. सोमवारी रात्री निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी 46.50 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले होते. मात्र, मंगळवारी पुन्हा खास प्रसिद्धी पत्रक काढून 53.22 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले आहे. एका रात्रीत अचानक 82,737 मतांची वाढ झाली. एका रात्रीत हा बदल झालाच कसा ? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी होणार्‍या मतमोजणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

पालघर पोटनिवडणुकीत ईव्हीएमचा खेळखंडोबा झाल्यानंतरही निवडणूक निर्णय अधिकारी मतदान संपल्यानंतर 46.50 टक्के नोंद जाहीर करतात आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा दुरुस्ती करत हाच टक्‍का 53.22 वर नेऊन ठेवतात. मतदानाच्या या दोन्ही आकडेवारीत 6.72 टक्के म्हणजे एकूण 82,737 मतांची तफावत आहे. 

मतांच्या या वाढलेल्या टक्केवारीबाबत शिवसेनेने संशय व्यक्त केला आहे. अंतिम आकडेवारीमध्ये एक, दोन टक्के मते वाढू शकतात मात्र, मतांची टक्केवारी सहा ते सात टक्के कशीकाय वाढली. एका रात्रीत 82 हजार मते कुठून आली? असा सवाल शिवसेनेने केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने अंतिम आकडेवारीत मतदानात होणारी वाढ ही नियमित बाब असल्याचे स्पष्ट केले. ही निवडणूक रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. महाराष्ट्र मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नीलेश अशोक पेंढारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट देवून निवडणूक अधिकार्‍यांना तसे निवेदन सादर केले. 

आज निकाल

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या पालघर आणि भंडारा — गोंदिया मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी 31 तारखेला जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु होणार असून दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे. पालघरमध्ये शिवसेना आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भंडारा — गोंदियामध्ये भाजप आणि काँग्रेस — राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सरळ लढत झाली. पालघरमध्ये भाजपचे राजेेंद्र गावीत, शिवसेनेचे श्रीवास वनगा, बविआचे बळीराम जाधव आणि काँग्रेसचे दामू शिंगडा यांच्यात लढत रंगली होती. तर, भंडारा — गोंदियात भाजपचे हेमंत पटले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांच्यात सामना रंगला. 

डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई या प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी प्रत्येकी 14 मतमोजणी टेबल मांडण्यात येणार आहेत. या मतमोजणी केंद्रात सुमारे 800 कर्मचारी कार्यरत राहणार असून 33 फेर्‍यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार होईल असे नियोजन करण्यात आले आहे.