Tue, Jun 18, 2019 20:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरच्या चौरंगी लढतीत श्रमजीवीचा भाजपला पाठिंबा

पालघरच्या चौरंगी लढतीत श्रमजीवीचा भाजपला पाठिंबा

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 11 2018 1:56AMबोईसर/ केळवे-माहीम/ मोखाडा : वार्ताहर 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी अखेरच्या दिवशी 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर, एकूण 14 उमेदवारांनी 20 अर्ज दाखल केले आहेत. मात्र, ही निवडणूक भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित, शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव व काँग्रेसचे दामोदर शिंगडा अशी चौरंगी लढत होणार आहे. अर्ज भरताना बहुजन विकास आघाडी आणि भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.  दरम्यान श्रमजीवी संघटना आपला स्वतंत्र उमेदवार उभा करेल, अशी अटकळ बांधण्यात आली होती. मात्र या संघटनेने आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला. 

भाजपतर्फे दोन दिवसांपूर्वी पक्ष प्रवेश केलेल्या राजेंद्र गावित यांची उमेदवारी दाखल करण्यात आली. यावेळी. गिरीश महाजन, विष्णू सवरा, रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, आ. मनीषा चौधरी, भाजपचे अनेक ज्येष्ठ  पदाधिकारी उपस्थित होते. ढोल पथक आणि डीजेच्या जोशात निघालेल्या रॅलीमध्ये श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले. बविआचे बळीराम जाधव आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसोबत डीजेसोबत रॅलीमधून आले. यावेळी पक्षप्रमुख आ. हितेंद्र ठाकूर, आ. विलास तरे, वसई- विरार पालिकेचे महापौर रुपेश जाधव, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, पक्षाचे कार्याध्यक्ष राजीव पाटील उपस्थित होते. तर,  काँग्रेसचे दामोदर शिंगडा यांनी रॅलीविनाच अर्ज दाखल केला. तत्पूर्वी पालघर तालुका काँग्रेस कार्यालयात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी आ. भाई जगताप, आ.  आनंद ठाकूर, विनायक देशमुख, राजेंद्र गवई, विश्वास पाटील उपस्थित होते.

अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्याकडेला गाड्या उभ्या केल्याने तसेच वाहतूक नियंत्रण ढिसाळ  असल्याने पालघर शहरातील वाहतूक व्यवस्था काही तास ठप्प झाली. एमएचसीटी ची परीक्षा असल्याने परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना  वाहतूक कोंडीचा फटका बसला.