Mon, Apr 22, 2019 12:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरमध्ये सहज मिळतो स्फोटकांचा साठा

पालघरमध्ये सहज मिळतो स्फोटकांचा साठा

Published On: Aug 12 2018 1:09AM | Last Updated: Aug 12 2018 12:12AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने नालासोपार्‍यातील भंडारअळीमध्ये राहात असलेल्या वैभव राऊत याच्या घरी आणि घरासमोरील दुकान गाळ्यातून 20 गावठी बॉम्बसह मोठ्याप्रमाणात स्फोटकांचे साहीत्य हस्तगत केले असले तरी पालघर जिल्ह्यात अशाप्रकारचा स्फोटकांचासाठा सापडण्याचीही पहिलीच वेळ नाही. येथील खाणींमध्ये मोठ्याप्रमाणात अवैधरीत्या अशाप्रकारच्या स्फोटकांचा वापर केला जातो. त्यांच्याकडून आर्थिक मोबदल्यात ही स्फोटके सहज विकत घेणे शक्य असल्याचे जाणकार सांगतात.

त्याआधी 27 ऑक्टोबर 2016 रोजी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या पालघर जिल्ह्यातील सातीवली गावात छापा टाकून 40 जीलेटीन कांड्या, 39 डिटोनेटरर्स, अमोनियम नायट्रेटची दोन पाकीटे आणि 18 किलो पावडर जप्त केली होती. या 18 किलो पावडरमधील 12 किलो आरडीएक्स असल्याचे कलीना फॉरेन्सीक लॅबमध्ये उघड झाले होते. यावेळी मात्र एटीएसने राऊत याच्या घरातून स्फोटकांच्या साहित्यासह बनिवण्यात आलेले 20 देशी बॉम्ब हस्तगत केले असल्याने त्याने हे बॉम्ब कोणत्या उद्देशाने बनविले होते, याचा शोध सुरू आहे.

ठाणे ग्रामीण पोलिसांसह मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि राज्यदहशतवाद विरोधी पथकाने यापूर्वीही पालघर जिल्ह्यात कारवाई करत मोठ्याप्रमाणात अवैधरीत्या साठविलेला शस्त्रसाठा जप्त केला होता.

पालघर जिल्ह्यातील गणेशपुरी परिसरात ठाणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने एका टव्हेरा गाडीवर छापा टाकून तब्बल 1 हजार 200 डिटोनेटर्स, जीलेटीन कांड्यांचे 7 बॉक्स आणि 150 किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट जप्त केले होते. 

गेल्यावर्षीच्या मे महिन्यात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते.