Sun, Jul 21, 2019 02:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरात पोटनिवडणूक प्रचाराचा जोरदार डंका

पालघरात पोटनिवडणूक प्रचाराचा जोरदार डंका

Published On: May 23 2018 1:51AM | Last Updated: May 23 2018 1:45AMवसई : दीपक मोहिते

पालघर पोटनिवडणुकीतील प्रचाराचा ज्वर आता वाढू लागला आहे. घामाच्या धारा वाहत असूनही उमेदवारांनी आपल्या प्रचारात खंड पडू दिला नाही.भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी दोन दिवसांपूर्वी नालासोपारा येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा पालघरच्या दौर्‍यावर येत आहेत.

पालघर लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकलीच पाहिजे, या जिद्दीने मुख्यमंत्री या निवडणुकीत उतरले आहेत. वर्षानंतर येणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक त्यांच्यासाठी एकप्रकारे अग्नीपरीक्षाच ठरणार आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तोफ बुधवारी मतदारसंघात धडाडणार आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे उद्या वसईत दाखल होत आहेत.त्यामुळे या आठवड्यात आरोप-प्रत्यारोप, वाद-विवाद, हेवे-दावे यांच्या जोरदार फैरी झडणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर रविवारच्या सभेत सडकून टीका केली. ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये बहुजन विकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ.ठाकूर यांच्या गळाभेटीचे फोटो व्हायरल करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशी जहरी टीका केल्याचे बोलले जात आहे. बविआने भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे पडसाद मुख्यमंत्र्यांच्या भाषणात उमटले. प्रचार करताना दोन्ही बाजुकडून समंजस भूमिका घेणे गरजेचे आहे,दुर्दैवाने ते होत नसल्याचे दिसून आले आहे. हळूहळू मतदारसंघातील वातावरण तापत असून शेवटच्या दोन दिवसांत ते अधिक संवेदनशील होईल,अशी भिती सर्वत्र व्यक्त होत आहे. दरम्यान भाजपचे राजेंद्र गावित यांनी मतदारसंघातील पश्चिम किनारपट्टीवरील गावे पिंजून काढली आहेत. त्यांना शहरी व ग्रामीण भागात मतदारांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे दिसते.

सेनेने शहरी भागातील प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागात तसेच वसई विरार शहरी भागात त्यांना प्रचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनीही प्रयत्नांची शिकस्त चालवली आहे. एकंदरीत मतदारसंघातील चित्र पाहता भाजपने आपली संपूर्ण ताकद या मतदारसंघात लावली आहे.