Thu, Jun 27, 2019 03:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरात चिखलफेकीमुळे घसरली प्रचाराची पातळी

पालघरात चिखलफेकीमुळे घसरली प्रचाराची पातळी

Published On: May 24 2018 1:51AM | Last Updated: May 24 2018 1:50AMवसई : दीपक मोहिते

पालघर पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात उमेदवारांची लगीनघाई सुरू झाली आहे. मतदारांचे ब्रेनवॉशिंग करण्याचे प्रयत्न सुरू  झाले आहेत. 26 मे रोजी सांयकाळी प्रचाराचा धुरळा खाली बसणार आहे. वसईच्या इतिहासात यंदा प्रथमच प्रचाराची पातळी घसरल्याचे अनुभवायला मिळाले. कुत्ता, सुअर आणि सिंह अशा जनावरांची नावे घेत एकमेकांवर चांगलीच चिखलफेक करण्यात आली. ज्येष्ठ नेतेच या वादात पडल्यामुळे कार्यकर्त्यांनीही तोंडसुख घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच आठवड्यात दोनदा वसईला भेट देणारे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्या आगमनामुळे भाजप कार्यकर्ते सुखावले होते. परंतु त्यानंतर सोशल मीडियावरून एकमेकांवर सुरू झालेली चिखलफेक दुर्दैवी होती. मुख्यमंत्री गुरुवारी पुन्हा जव्हार व बोईसर येथे येत आहेत. भाजपच्या स्मृती ईराणी, रिटा बहुगुणा, रावसाहेब दानवे, रवींद्र चव्हाण, राज पुरोहित, खा.मनोज तिवारी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सहकार्‍यांनी मतदारसंघात हजेरी लावली. सेनेच्या नीलम गोर्‍हे, दीपक सावंत, एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक, खा.संजय राऊत हे प्रचारात उतरले.दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे यांनीही हजेरी लावली आहे. बविआच्या उमेदवाराचा प्रचार मात्र आमदार हितेंद्र ठाकूर स्वत: एकहाती राबवत आहेत. जाहीर सभा घेण्याऐवजी त्यांनी चौकसभा व प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेण्यावर भर दिला आहे. भाजपने या पोटनिवडणुकीत प्रचंड ताकद लावल्यामुळे सारे पक्ष हबकून गेले आहेत. 

प्रशासकीय कार्यक्रमाची आखणी व नियोजन ही संपूर्ण यंत्रणा पक्षाचे वरिष्ठ नेते हाताळत असल्यामुळे राजेंद्र गावित यांना प्रचारात अडचणींना सामोरे जावे लागले नाही.