होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संघ मुखपत्र आणि ‘सामना’तून कलगीतुरा

संघ मुखपत्र आणि ‘सामना’तून कलगीतुरा

Published On: May 23 2018 1:51AM | Last Updated: May 23 2018 1:30AMमुंबई : खास प्रतिनीधी

पालघरच्या पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू झालेले वाक्युध्द आता दोघांच्याही मुखपत्रांपर्यंत पोहोचले असून शिवसेनेने सामनातून भाजपाविरोधी प्रचाराचा धडाका लावला असताना आता भाजपा आणि संघविचारांच्या तरूण भारतमधून शिवसेनेवर थेट हल्लाबोल करण्यात आला आहे. चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर त्याचे गलिच्छ राजकारण करणारी शिवसेना गिधाडाच्या वृत्तीची असून वाघनखांचा आव आणत असली, तरी त्यांची कृती मात्र पाठीत खंजीर खुपसण्याचीच आहे, अशी जोरदार टिका तरूण भारतने आपल्या विशेष संपादकीयात केली आहे. 

सेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्या मृत्यूनंतर भाजपाने तेथे आपला उमेदवार दिला नव्हता, इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्री स्वतः घोडा यांचे पुत्र आणि शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा यांच्या प्रचारासाठी गेले होते, याची आठवण करून देताना शिवसेनेने मात्र वनगांच्या मुलाला आपल्या पक्षाकडून उमेदवारी देऊन  मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टिका त. भा. ने केली आहे. .

सत्तेसाठी शिवसेना अनेकदा युतीच्याही धर्माला जागलेली नाही, याची आठवण या संपादकीयातून करून देण्यात आली आहे. आता तर  देवाघरी गेलेल्या मित्राच्या टाळूवरील लोणी खरडून खाण्याच्या या प्रकारावरून शिवसेनेचा भाजपद्वेष किती टोकाला गेला आहे, हे दिसते. भाजपशी सरळ लढाई घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याची शिवसेनेत धमक नाही. कारण बाहेर पडताना सेनेचे कितीतरी लोक आतच राहतील, याची उद्धव ठाकरेंना पूर्ण कल्पना आहे. आज शिवसेनेला दिवंगत चिंतामण वनगा यांच्या चिरंजीवांचा कळवळा आला असला, तरी वनगा गेले, त्या दिवशी शिवसेनेतले कुणीही त्यांच्यापर्यंत पोहोचले नव्हते. ज्या उद्धव ठाकरेंना श्रीनिवास वनगांविषयी पान्हा फुटला आहे, तेदेखील वनगांच्या अंत्यविधीला पोहोचले नव्हते. आता केवळ भाजपचा पराभव व्हावा म्हणून शिवसेना हे गलिच्छ राजकारण खेळत असल्याचे संपादकीयात म्हटले आहे.  

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला बेइमान पक्षाची उपमा दिली आहे. पक्षासाठी हयात घालवणार्‍या कार्यकर्त्याला मृत्यूनंतर वार्‍यावर सोडून देणं ही बेइमानी आहे. पैशांच्या थैल्या रिकाम्या करून आमदार विकत घेणे ही बेइमानी आहे. कर्नाटकात भाजपच्या रामलूंसारख्या धनदांडग्यांचे प्रयत्न फसले आहेत. पालघरला असे बेइमान पाचोळ्यासारखे उडून जातील. कारण, बेइमानीचा पराभव सुरू झालाय,अशी तोफ उद्धव यांनी डागली आहे.

शिवसेनेने वनगांच्या मुलाला भाजपाच्याविरोधात उमेदवारी देणे, ही बेइमानी असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यास प्रत्युत्तर देताना उध्दव यांनी भाजपा आणि मुख्यमंत्र्यांवर सामनाच्या संपादकीयातून प्रतिहल्ला चढवला आहे.  भाजप बेताल आणि खोटा प्रचार करत असल्याचा आरोप करताना या पोटनिवडणुकीने भाजपला घाम फोडला असल्याचे उध्दव यांनी म्हटले आहे.