Sun, Mar 24, 2019 08:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरच्या फडात योगी विरुद्ध उद्धव!

पालघरच्या फडात योगी विरुद्ध उद्धव!

Published On: May 24 2018 2:05AM | Last Updated: May 24 2018 2:05AMअन् काम अफजल खानाचे : योगींचा सेनेवर हल्ला

खानिवडे : वार्ताहर

शिवाजी महाराजांना कोणी एक पार्टी कैद करू शकत नाही. ते संपूर्ण देशाचे अभिमान आहे. आता शिवाजी महाराजांचे नाव घेणार्‍यांकडून अफजलखानाचे कृत्य घडत आहे, अशी  जहरी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेवर केली. ते पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी वसईतील मनवेलपाडा येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते.

योगी आदित्यनाथ यांनी भाषणाची सुरुवात मराठीत बोलून केली. मला आपल्या सोबत बोलण्याचा खूप आनंद होत आहे, असे सांगून उपस्थित मान्यवरांचे कार्यकर्त्यांचे तसेच जनसमुदायाचे त्यांनी मराठीत बोलून स्वागत केले आणि त्यांच्या भाषणाचे पूर्ण टार्गेट शिवसेना राहिले

योगी म्हणाले, असा कोणीही भारतीय नाही ज्याला स्वर्गीय हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्धल गर्व नाही. असा समोरून लढणारा नेता आता बघायला मिळत नाही. कारण  सध्या सत्तेसाठी पाठीमागून सुरा भोसकणे सुरू आहे, अशी टीका त्यांनी शिवसेना नेतृत्वावर केली. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन अफजलखानाचे काम करणार्‍यांपासून नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन योगी यांनी केले. पालघरवासीयांनी आणखी किती काळ तुम्ही दहशतीखाली वावरणार? असा सवालही त्यांनी केला. यावेळी व्यासपिठावर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, विष्णू सावरा, विद्या ठाकूर, वसईचे माजी आमदार विवेक पंडित , उत्तर प्रदेशच्या मंत्री रिटा बहुगुणा, अलिराज हरी, अनिल राजभर यांच्यासह वसई-विरार प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीचे भाजप नेते उपस्थित होते. 

महाराष्ट्राचे व उत्तर प्रदेशचे नाते हे प्रभू श्रीराम यांच्या वनवास काळातील पंचवटी नाशिक या ठिकाणापासून घट्ट होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी प्रमुख पुरोहित म्हणून आलेल्या गागाभट्ट  इथपर्यंत न थांबता आजही घट्ट आहे. याचे आताचे उदाहरण म्हणजे याच लोकसभा क्षेत्राचे सलग पाच वेळा नेतृत्व करणारे उत्तर प्रदेशचे राज्यपाल.  राम  नाईक हे केवळ उत्तर प्रदेश चे राज्यपाल नसून महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमधील  सांस्कृतिक  सेतूचे काम करत आहेत, असे योगी म्हणाले.

राम नाईक यांच्यामुळे उत्तर प्रदेशात महाराष्ट्र स्थापनादिवस उत्तर भारतीयांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच प्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत सरकार कसे चालवले जावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तसेच मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार भारताला समृद्धीकडे घेऊन जात आहे. त्यामुळे त्यांचे हात अधिक बळकट करणे हे प्रत्येक भारतमातेच्या सपुताचे काम आहे, वक्तव्य त्यांनी केले.

वनगांच्या निष्ठेचा पराभव भाडोत्री नेते करू शकणार नाहीत : उद्धव

विरार : वार्ताहर

भाजपकडे स्वतःचा उमेदवार नाही, प्रचाराला कार्यकर्ते नाहीत. प्रचाराला वरून माणसे  बोलवावी लागतात. उद्या ते जपान, रशियाच्या पंतप्रधानांनाही बोलवायला कमी  या आदिवासी मुलाला पाडण्यासाठी त्यांना त्यांच्या बापजाद्यांना बोलवावे लागत असून त्यातच त्यांचा पराभव आहे. श्रीनिवास वनगाकडे निष्ठा आहे आणि निष्ठेचा पराभव भाडोत्री नेते करू शकणार नाही, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारासाठी बुधवारी वसंत नगरी येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होेते.

उद्धव म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात वसई, विरारमधील  कुत्र्या, मांजरीचा उल्लेख केला. मात्र, मुख्यमंत्री नेमके कुत्रा कोणाला म्हटले हे त्यांनाच माहित आहे.त्यावर कुणीतरी  खुलासा केला होता की, कुत्रा असलो तरी जनतेशी इमानी आहोत. परंतु स्वतःला तुम्ही कुत्रा म्हणवून घेतले असेल तर निवडणुकी पुरते भुंकू नका. निवडणूक झाल्यानंतर त्यांचाच पट्टा गळ्यात घालून शेपूट हलवून त्यांच्यामागे फिरू नका. हे दिखाव्याचे राजकारण नाही. आज येथे शिवरायांचे तमाम मावळे जमलेले असून ते तुतारी फुंकणारे आहेत, शिट्ट्या फुंकणारे नाहीत अशी टीका त्यांनी बविआवरही केली.

आरोप आणि प्रत्यारोप करून काही साध्य होणार नाही. हा काही तमाशाचा फड नाही. इकडे आलेली लोक काही तमाशा बघायला आले नाहीत. आज देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. गेल्या चार वर्षात त्यांनी  जो काही खटाटोप केला आहे, तो जनता बघत आहे.त्यामुळे अबकी बार आता काही नाही अबकी बार फुसका बार, अस हल्ला त्यांनी भाजपवर चढवला. मित्राने पाठीत वार केला, या मुख्यमंत्र्यांच्या टिकेचाही त्यांनी चांगला समाचार घेतला.

गावितांना विधानसभेची उमेदवारी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. परंतु तीन महिन्याआधी श्रीनिवास वनगा यांना बोलावून ही उमेदवारी का नक्की केली नाही? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. जर मी वनगा परिवाराला एका पैशाचे आमिष दाखवले असेल, तर वनगा परिवाराने सांगावे शिवसेनेने काय दिले आणि भाजप त्यांना काय देत होता. अश्रू विकत घेणारा अजून जन्माला आला नाही. वनगा परिवाराच्या अश्रूंना न्याय द्यायचा आहे. मी आज इकडे मत मागायला आलो नसून त्यांना न्याय द्यायला आलो, असे ते म्हणाले. 

योगींचाही समाचार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरारच्या सभेत पायात चप्पल घालून शिवाजी महाराजांना  वंदन केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, योगी हे आमच्यासाठी कसपटा समान आहेत. गोरखपूर येथे मरण पावलेल्या बालकांच्या पालकांचे श्राप घेऊन येथे योगी आले. त्या बालकांना साधे ऑक्सिजन देऊ शकले नाही ते इकडे येऊन काय करणार? असा खोचक सवाल त्यांनी केला. जर उत्तर प्रदेशातील नागरिकांना सर्व सुविधा मिळणार असतील, तर श्रीनिवासची उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे, असे ते म्हणाले. आयात नेत्यांच्या जोरावर तुम्ही निवडणूक लढताय आणि प्रचारालाही नेते आयात करताय. यावरून तुमचा पक्ष संपत चाललाय, असा टोलाही उद्धव यांनी हाणला.