Tue, Jul 23, 2019 06:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेनेने भाजपशी बेईमानी केली : फडणवीस

सेनेने भाजपशी बेईमानी केली : फडणवीस

Published On: May 21 2018 1:37AM | Last Updated: May 21 2018 1:32AMडहाणू/नालासोपारा : पुढारी वृत्तसेवा

आमदार कृष्णा घोडा यांच्या निधानमुळे रिक्त झालेल्या पालघर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला मित्रपक्ष म्हणून खुल्या मनाने पाठिंबा देऊन सेनेसाठी मते मागितली. मात्र, भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यानंतर शिवसेनेने कट-कारस्थान करून भाजपशी बेईमानी केली, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी रविवारी केला. पालघर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी डहाणू व नालासोपारा येथे झालेल्या प्रचारसभांमध्ये ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ही पोटनिवडणूक भाजप जिंकली तरच ती वनगांना श्रद्धांजली ठरेल. चिंतामण वनगा यांनी संघर्षमय जीवन जगताना आदिवासींसाठी लढून राजकारणात एक एक पद मिळवले. ते भाजपकडून 9 वेळा निवडणुका लढले. काही निवडणुका हारले, तरीही त्यांची  पक्षनिष्ठा कायम होती. राजकारणात वनगांनी कम्युनिष्ट, काँग्रेस, शिवसेनेशी संघर्ष केला. त्यांच्या  निधनानंतर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आपण विविध पक्षांशी बोलून पालघर लोकसभेसाठी वनगा परिवारात तिकीट देण्याचे कबूल केले होते. यापूर्वी कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर झालेल्या पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी  मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसाठी खुल्या दिलाने पाठिंबा दिला. मात्र, शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. आज जे वनगा तिकिटासाठी मातोश्रीवर गेले आहेत, ते पडल्यानंतर त्यांना शिवसेनेचे दार कायमचे  बंद होईल. मात्र, तरीही आपण वनगा कुटुंबाच्या मागे राहू, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. 

पालघर जिल्ह्यात विकास प्रकल्प प्रकल्प राबवून हे सरकार  कोणालाही  विस्थापित होऊ देत नाही.आधीच्या सरकारने विस्थापित केलेल्यांचे  पुनर्वसन करण्याचे काम आम्ही करत आहोत. आजवर आमच्या सरकारने  वन जमिनींचे 35 हजार पट्टे दिले. येत्याच2019 च्या विधानसभा प्रचारापर्यंत  एकही पट्टा शिल्लक ठेवणार नाही. वन जमिनींचा पट्टा दिला त्याला सर्व योजना दिल्या. नरेगा अंतर्गत बागा तयार केल्या. हे सरकार गरीब आदिवासींच्या पाठीशी उभे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

चिंतामण वनगांचा वारस होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजपने संघर्षशिल नेतृत्व राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. गावित यांनी सरकारमध्ये राहून पालघर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यावेळी चिंतामण वनगा उपोषण करून पाठिंबा देत होते. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीत या दोन व्यक्तिंचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद‍्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. 

डहाणू तालुक्यात कासा येथील भिसे हायस्कूलच्या मैदानावर ही सभा घेण्यात आली. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री विष्णू सवरा, श्रमजीवी संघटनेचे प्रमुख विवेक पंडित, आ.मनिषा चौधरी, संजय केळकर, प्रवीण दरेकर, पास्कल धनारे, किसन कथोरे, खासदार कपिल पाटील, के.सी. पटेल, आर.सी. पाटील, नगराध्यक्ष भरत राजपूत, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

वनगा कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही : मुख्यमंत्री 

विरार ः चिंतामण वनगा ही कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही, ती भारतीय जनता पक्षाची प्रॉपर्टी आहे. चिंतामण वनगा हा आमच्या पक्षाचा विचार असल्याने आम्ही त्यांचे चित्र लावले. ते आज जिवंत असते आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीही भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त विचार केला असता, तर त्यांनी कोणालाही कधीच माफ केले नसते, अस वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालासोपार्‍यात केले. ते राजेंद्र गावित यांच्या प्रचारसभेत बोलत होते.यावेळी व्यासपिठावर मनोज तिवारी, पालकमंत्री विष्णू सवरा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

वसई-विरार महापालिकेतून वगळलेली 29 गावे ही पालिकेत समाविष्ट होऊ देणार नाही. ही गावे म्हणजे वसईचा हरितपट्टा आहे, तो कधीच नष्ट होऊ देणार नाही. येथील गावकर्‍यांना जर स्वतंत्र महापालिका किंवा स्वतंत्र ग्रामपंचायत हवी असेल तर त्यांच्या म्हणण्यानुसार तसा निर्णय घेऊ, असे आश्‍वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. वसई-विरार हा सत्ताधारी बविआ म्हणजेच शिट्टीचा इलाका आहे असे सांगितले जाते. मात्र, इलाका हा कुत्र्यांचा असतो आम्ही तर वाघ आहोत अशी टीका फडणवीस यांनी बविआवर केली.