Tue, Jul 23, 2019 17:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन

पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन

Published On: Jan 31 2018 2:05AM | Last Updated: Jan 31 2018 1:49AMनवी दिल्ली/तलासरी/वसई : प्रतिनिधी

पालघर लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा (67) यांचे मंगळवारी दिल्लीत ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुले व 3 मुली असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पालघर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी चिंतामणी वनगा नवी दिल्लीत होते. त्यांच्या छातीत सोमवारपासून दुखत असल्याने मंगळवारी ते घरीच विश्रांती घेत होते. सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत जास्त दुखू लागल्याने राममनोहर लोहिया रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. 

वनगा तलासरी तालुक्यातील कवाडा गावचे रहिवासी होते. राजकरणातील अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने पालघर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. निधनाचे वृत्त समजताच त्यांचे कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकार्‍यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

पालघरचे खासदार चिंतामणी वनगा यांच्या निधनाने धक्‍का बसला आहे. चिंतामणी वनगा हे त्यांच्या साधेपणामुळे ओळखले जात. त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि कार्यकर्ते यांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.