Fri, Apr 19, 2019 08:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर लोकसभा पोटनिवडणूक: भाजपकडून सवरा, तर काँग्रेसकडून...

पालघर लोकसभा पोटनिवडणूक: भाजपकडून सवरा, तर काँग्रेसकडून...

Published On: Apr 16 2018 10:42AM | Last Updated: Apr 16 2018 10:41AMमोखाडा : वार्ताहर

पालघर लोकसभा पोटनिवडणूक होईल की, लोकसभेपर्यंत ती होणारच नाही, या शक्यतेमुळे मागील काही दिवसांपासून राजकीय हालचालींचा वेग कमी झाला होता. मात्र आता पुन्हा पोटनिवडणूक होणार असल्याची चर्चा रंगत असून अगदी दोन दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या काही माजी मंत्र्यांची टीम पालघर जिल्हा दौर्‍यावर असून संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीसाठी ही कमिटी आल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून दिवंगत वणगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वणगा यांचे नाव चर्चेत असतानाच आता विद्यमान मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांचेही नाव या पोटनिवडणुकीसाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

भाजपासाठी सुरक्षित समजली जाणारी ही लोकसभा निवडणूक अंतर्गत बंडाळीमुळे भाजपाला अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून माजी मंत्री राजेंद्र गावीत, माजी खासदार, ज्येष्ठ नेते दामोदर शिंगडा यांचे पुत्र सचिन शिंगडा यांचेही नाव चर्चेत आहे. सध्या सहापेक्षाजास्त उमेदवार इच्छुकअसल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेची भूमिका अस्पष्ट असल्यामुळे अनेकांची राजकीय गणिते अद्याप तरी जुळलेली नाहीत.

पालघर लोकसभा युतीचे खासदार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले दिवगंत खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला होता. सुरुवातीला मंत्री सवरा किंवा त्यांचे पुत्र यांच्या नावाची चर्चा जोर धरत असतानाच दिवंगत वणगा यांचे पुत्र श्रीनिवास वणगा यांच्या नावाची चर्चाही सुरू झाली.

श्रीनिवास यांनी मध्यंतरी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचे समोर आले. मात्र या भेटीत नेमके काय झाले, याबाबत स्पष्ट करण्यात आले नाही. त्यानंतर श्रीनिवास हे मोखाडा, जव्हार भागात विविध कारणांमुळे फिरायला लागल्याने या पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता मानली जात होती. सध्या मंत्री सवरा यांनाच भाजप ही निवडणूक लढवायला लावणार असल्याचे खास सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

- काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्‍चित होऊन ही जागा काँग्रेस लढवेल, असे खात्रीलायक वृत्त आहे.

- याच धर्तीवर काल (दि.15) पालघरातील उमेदवार निवडीबाबत राज्यस्तरीय कमिटी येऊन गेल्याची माहिती मिळाली आहे.

- कालच (दि.15)शिवसेनेची एक महत्त्वपूर्ण बैठक जव्हारमध्ये पार पडली. यामुळे सध्या पालघरमध्ये पोटनिवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत.