Fri, Feb 28, 2020 17:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर पोटनिवडणूक; बाजी कुणाची? चर्चेला उधाण

पालघर : बाजी कुणाची? चर्चेला उधाण

Published On: May 30 2018 2:14AM | Last Updated: May 30 2018 7:26AMमोखाडा/वसई : प्रतिनिधी

अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे. अत्यंत कमी मताधिक्याने उमेदवार विजयी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत विक्रमगड विधानसभा 1 लाख 58 हजार 30, डहाणू 1 लाख 49 हजार 266, पालघर 1 लाख 44 हजार 905, बोईसर 1 लाख 58 हजार 133, नालासोपारा 1 लाख 50 हजार 687 आणि वसई 1 लाख 32 हजार 966 या प्रमाणे विधानसभानिहाय मतदान झाले आहे. बविआचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या नालासोपारा आणि वसई विधानसभेत मतांचा टक्का घसरल्याने ते कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. डहाणू आणि विक्रमगड विधानसभेत भाजपचे आमदार आहेत. येथे वाढलेली मतांची टक्केवारी भाजपला दिलास देणारी ठरेल, असेही बोलले जात आहे. विक्रमगड, पालघर आणि बोईसर हे विधानसभा मतदारसंघ कदाचित सेनेला तारू शकतील. डहाणू येथे श्रीनिवास वनगांना मिळणार्‍या सहानुभूतीचा फायदा सेनेला होण्याची शक्यता आहे.

येथील निकाल वसई, नालासोपारा व बोईसरमधील मतदानावर आधारित असतात. वसईतील मतदानाची टक्केवारी 48.40 आहे. नालासोपार्‍यात 34.75 टक्के मतदान झाले.या दोन्ही मतदारसंघातील मतदानावर सर्व राजकीय पक्षांची भिस्त होती.मात्र, मतदार घराबाहेर पडलेच नाहीत. बोईसर विधानसभा मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. विक्रमगड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक  62.64 टक्के मतदानाची नोंद झाली. बहुजन विकास आघाडीची सारी मदार या परिसरावर होती,परंतु त्यांचाही अपेक्षाभंग झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दोन मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून आमदार ठाकूरांना वसई तालुक्यातच जखडून ठेवले. मुख्यमंत्र्यांची ही खेळी यशस्वी ठरल्याची चर्चा आहे.