Thu, Apr 25, 2019 15:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  पालघरचा तापलेला प्रचार थंडावला!

 पालघरचा तापलेला प्रचार थंडावला!

Published On: May 27 2018 1:47AM | Last Updated: May 27 2018 1:47AMमोखाडा : हनिफ  शेख

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचंड तापलेला प्रचार शनिवारी संपला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी असा तिरंगी सामना पालघरच्या रणांगणात रंगला असून सोमवारी होणार्‍या मतदानात पालघर जिल्हा कुणाच्या बाजूने कौल देतो हे गुरुवारी 31 मे रोजी होणार्‍या मतमोजणीतच स्पष्ट होईल. या निवडणुकीत खरी लढत झाली ती शिवसेना आणि भाजपमध्ये. आयाराम उमेदवार आणि आयाराम नेत्यांमुळे गाजलेल्या या निवडणुकीने शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील सामना आणखी टोकाच्या पातळीवर नेऊन पोहोचवला. 

भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा पोटनिवडणूक लागली. जेमतेम एक वर्षासाठी नवा खासदार निवडून द्यायचा असला तरी ही जागा भाजपकडून खेचण्यासाठी शिवसेनेने आक्रमक राजकारण केले आणि भाजपनेही ही जागा राखण्यासाठी अटीतटीची झुंज दिली. परिणामी, पालघरच्या रणांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रदीर्घ मुक्‍काम ठोकला. या दोन नेत्यांमधील कलगीतुरा हा देशभरातील माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. आधीच या मित्रपक्षांमधून विस्तव जात नसतानाच आता पालघरच्या निवडणुकीमुळेउभय पक्षांमधील दरी आणखी वाढली आहे. निकाल काहीही येवो मात्र, भविष्यात सत्तेसाठी हे पक्ष काय करू शकतात याचा हा डेमो असणार हे नक्की. त्यामुळे उमेदवारच नव्हे तर प्रचारही आयात झालेली पालघर पोटनिवडणूक राजकिय जाणकारांसाठीही अभ्यासाचा विषय ठरणार आहे.

शिवसेनेने दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवबंधन बांधून उमेदवारी जाहीर केली. भाजपला तो पालघरात बसलेला पहिला धक्‍का होता. त्यानंतर शिवसेनेने प्रचंड शक्तीप्रदर्शन करून भाजपविरोधात दंड थोपटले. पालघरचे मैदान मारण्यासाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तळ ठोकून होते. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, प्रा. नितीन बानुगडे पाटील, आमदार नीलम गोर्‍हे, महिला संपर्क नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रचाराची धूरा सांभाळली. आदित्य ठाकरे यांनीही रोड शो घेतला.

भाजपनेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना गळाला लावून उमेदवारी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी स्वतः भाजपच्या प्रचाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी, माधव भंडारी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे होते. नालासोपारा, विरारमधील उत्तर भारतीयांची संख्या विचारात घेऊन भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अभिनेते मनोज तिवारी यांनाही मैदानात उतरवले. बविआचा प्रचार मात्र, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एकहाती सांभाळला. भाजपकडून बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश  महाजन असे दिग्गज नेते मोखाड्यासारख्या दुर्गम आणि कमी मतदान असलेल्या भागात लक्ष ठेवून आहेत. यामुळे मताधिक्याने पुढे असलेली बहुजन विकास आघाडीही या दोहोंच्या वादळी प्रचारात झाकोळली गेली आहे. तर राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवणार्‍या काँग्रेसची अवस्था तर अतिशय बिकट असल्याचे चित्र दिसत आहे.