Mon, Apr 22, 2019 22:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर!

पालघर लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर!

Published On: Apr 27 2018 1:39AM | Last Updated: Apr 27 2018 1:29AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालिम ठरणार्‍या पालघर, भंडारा-गोंदिया मतदारसंघासह सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 28 मे रोजी जाहीर झाली आहे. 31 मे रोजी या निवडणुकीची मतमोजणी होईल.

भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी डिसेंबर 2017 मध्ये भाजप आणि खासदारकीचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. तर पालघर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांचे निधन झाल्याने ही जागाही रिक्त होती. या दोन्ही जागांसाठी आता निवडणूक होणार आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठीही पोटनिवडणूक लागली आहे. भारत 

निम्या राज्यात आचारसंहिता 

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठीदेखील काही दिवसांपूर्वीच निवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी 13 जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. आता लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्याने भंडारा, गोंदिया, पालघर तसेच सांगली अशा आणखी चार जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्याने राज्यात एकूण 17 जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता आहे. 

17 लाख मतदार बजावणार हक्क

वसई : पालघर लोकसभा मतदारसंघात 28 मे रोजी 17 लाख 24 हजार 06 मतदार आपल्या मताचा हक्क बजावणार आहेत. त्यात 9 लाख 37 हजार 80 महिला तर 8 लाख 20 हजार 120 पुरुष मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक मतदार नालसोपारा विधानसभा क्षेत्रात असून त्यांची संख्या 4 लाख 29 हजार 273 आहे. डहाणू मतदारसंघात सर्वात कमी 2 लाख 51 हजार 438 मतदार आहेत.

या मतदारसंघात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई अशा 6 विधानसभा मतदारसघांचा समावेश आहे. डहाणू आणि विक्रमगड भाजप, पालघर शिवसेना, बोईसर,नालासोपारा आणि वसई बहुजन विकास आघाडी असे पक्षीय बलाबल आहे.

Tags : Mumbai, Mumbai news, Palghar, Lok Sabha by election, Announced,