Fri, Feb 22, 2019 15:47



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरमध्ये आज मतदान : भाजप-शिवसेनेची प्रतिष्ठेची लढाई

पालघरमध्ये आज मतदान : प्रतिष्ठेची लढाई

Published On: May 28 2018 1:49AM | Last Updated: May 28 2018 7:04AM



वसई : प्रतिनिधी

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान होत असून, ही निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

मतदानासाठी 2097 मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून 12 हजार 894 कर्मचारी तसेच चार हजार 219 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या निवडणुकीची मतमोजणी 31 मे रोजी होणार आहे. शिवसेना, भाजप आणि बहुजन विकास आघाडी असा तिरंगी सामना या निवडणुकीत असला तरी खरी लढत सेनेचे श्रीनिवास वनगा आणि भाजपचे राजेंद्र गावित यांच्यातच होण्याची चिन्हे आहेत. 

पोलीस यंत्रणेने रविवारी दुपारी चारपासून जिल्ह्यात नाक्यानाक्यांवर पोलीस बंदोबस्तात वाढ केली.  मतदान आणि 31 मे रोजी होणार्‍या मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी 4 जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. मतदान सुरळीत व शांततेत पार पडेल असा विश्वास निवडणूक  अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई

डहाणू ग्रामीण : पालघर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले.राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या अनामिकेला शाई लावणेचे निर्देश दिले असल्याने भारत निवडणूक आयोगास अन्य बोटाला शाई लावण्यास मान्यता देण्याची विनंती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी केली. त्यानुसार डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याची मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.

2097 केंद्रांपैकी 14 केंद्रांना संवेदनशील असे नमूद करण्यात आले आहे. या केंद्रांकडे शासकीय यंत्रणेचे अधिक लक्ष राहणार आहे. पालघर लोकसभा क्षेत्रातील डहाणू विधानसभा क्षेत्रात 327, विक्रमगड 328, पालघर 318, बोईसर 338, नालासोपारा 449 तर वसई विधानसभा क्षेत्रात 327 मतदान केंद्रे आहेत. यापैकी डहाणू मधील पतीलपाडा(63), बोईसर मधील बोईसर(34), धोंडीपूजा (85), खैरपडा (294) तसेच वालीवमधील तीन केंद्र, नालासोपारा विधानसभा क्षेत्रात निळेमोरे येथील पाच आणि आचोळे येथील दोन अशी एकूण 14 केंद्र संवेदनशील केंद्र घोषित करण्यात आली आहेत.

पालघरप्रमाणेच भंडारा - गोंदिया मतदार संघातही मतदान होत असून भाजपच्या हेमंत पटले यांच्यासमोर एकेकाळी भाजपचे तीन वेळा आमदार राहिलेल्या मधुकर कुकडे यांचेच आव्हान आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीने आघाडी करीत आपली ताकद निवडणुकीत झोकून दिल्याने या मतदार संघाचे चित्र अनिश्‍चित बनले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांसाठी विजय महत्त्वाचा आहे.