Sun, May 26, 2019 18:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरमध्ये विधानसभेची गणिते बदलली 

पालघरमध्ये विधानसभेची गणिते बदलली 

Published On: Jun 01 2018 1:37AM | Last Updated: Jun 01 2018 1:25AMपालघर/मोखाडा : हनिफ शेख 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने वसई आणि नालासोपारा विधानसभा वगळता जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांची गणिते भारतीय जनता पक्षाने बदलून टाकली आहेत. पालघर हा एकमेव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. तिथेही भाजपने आघाडी घेतली. 

संपूर्ण पालघर जिल्ह्यात भाजपाने जोरदार मुसंडी मारलेली दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही पोटनिवडणूक  भाजपने जिंकली. त्यासोबतच वसई आणि नालासोपारा विधानसभा वगळता भाजपाने बाकी विधानसभा मतदार संघात  आपले मताधिक्यदेखील वाढविले. नालासोपारा आणि वसईमध्ये बविआ नेहमी प्रमाणे नंबर वन राहिली तरी मतांची टक्केवारी कमी असल्याने मागील विधानसभाच्या अनुषंगाने त्यांची मते या लोकसभेत घसरली.

मागील विधानसभेची आकडेवारी पाहता भाजपची जिल्हात दीड लाखांच्या आसपास, तर सेनेची सव्वादोन लाख आणि बविआची तीन लाखांपर्यंत मते होती.  या पोटनिवडणुकीत बविआची मते प्रचंड घटली, तर सेनेने आपला मतांचा टक्का कायम ठेवला. काँग्रेसला पाचवा नंबर गाठावा लागला. 

वसई विधानसभा हा बहुजन विकास आघडीचा बालेकिल्ला. तिथे बविआने आपल्या मतांचा टक्का कायम ठेवला असला, तरी मतदानाचे घटलेले प्रमाण भोवले. गेल्या विधानसभा निवडणुकीत तिथे 97 हजार मते घेणार्‍या बविआला या लोकसभा पोटनिवडणुकीत याच ठिकाणी 64 हजार 478 मते पडली. बविआची अशीच अवस्था नालासोपारा या विधानसभा मतदारसंघातही  झाली. या दोन विधानसभा मतदारसंघांच्या भरवशावर असलेल्या बविआने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

नालासोपारा विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे बविआचे वर्चस्व राहिले. येथे बळीराम जाधव यांना 79 हजार 134 मते मिळाली. ही मते शिवसेना (27,265), भाजप (37,623), काँग्रेस (3,662), माकप (786), मार्क्ससिस्ट लेनिनिस्ट (306), संदीप जाधव (अपक्ष - 306) यांच्या एकत्रित मतांपेक्षाही अधिक आहेत. बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने आपली मते वाढवून बविआचे आमदार विलास तरे यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सेनेने इथे 49 हजार 991 मते मिळवत आपला वरचष्मा प्रस्थापित केला. 

पालघर जिल्ह्याच्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वात लक्षणीय लढत डहाणू विधानसभा मतदारसंघात  होती. येथून सेनेला म्हणजेच श्रीनिवास वनगा यांना सहानुभूतीची मते जास्त मिळतील अशी अपेक्षा होती. दिवगंत वनगा हे या मतदारसंघात राहत होते, मात्र येथे भाजपाने सर्वाधिक 48 हजार 531 मते मिळवली, तर सेनेला 38 हजार 186 मते मिळाली. सेनेला सहानुभूतीची मते नक्की मिळाली मात्र ती भाजपाला मागे पाडू  शकली नाही, हे विशेष. याठिकाणी राष्ट्रवादीने भाजपाला छुपी मदतही केल्याचे बोलले जात आहे. विक्रमगड विधानसभेत भाजपा आणि सेना दोन्ही पक्षांच्या मतांत वाढ झाली. भाजपाला येथे सर्वाधिक 56 हजार 578 मते मिळाली. 51 हजार 164 मते सेनेला मिळाली. म्हणजे डहाणू आणि विक्रमगडने भाजपाला खर्‍या अर्थाने तारले, तर वसई पालघरने भाजपच्या मताधिक्यात भर टाकल्याने  भाजपाचा विजय निश्चित झाला. 

या निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ला, तर बविआची हवा निघून गेली. शिवसेनेने चांगलीच टक्कर दिली मात्र विजयाला पर्याय नसतो. या निवडणुकीत सर्व मंत्र्यांनी कार्यकर्त्यांसारखे स्वतःला झोकून दिले. निवडणूक जिंकण्यासाठी जे-जे करायला हवे ते-ते केले. परिणामी या विजयाचे श्रेय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कुटनीतीेचे आहे, असे मानले जात आहे.