Sat, Jul 20, 2019 09:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपाच्या उमेदवारानंतर ठरणार अन्य पक्षांच्या भूमिका 

भाजपाच्या उमेदवारानंतर ठरणार अन्य पक्षांच्या भूमिका 

Published On: Feb 05 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 12:55AMमोखाडा : हनिफ शेख 

पालघर लोकसभेचे खा. चिंतामण वणगा यांच्या आकस्मिक निधनाने पालघर लोकसभेची समीकरणेच बदलली आहे. अवघ्या काही महिन्यांसाठी का होईना येथे पोटनिवडणूक होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांच्या अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. भाजप कोणाला उमेदवारी देणार यावरूनच सर्व पक्षांच्या भूमिका ठरणार असल्याचे सूतोवाच पक्षांकडून होत आहे.

2014 च्या पालघर लोकसभेच्या निवडणुकीत दिवंगत वणगा यांनी 2 लाख 39 हजार मतांनी विरोधकांना धूळ चारली होती. हा कार्यकाल संपायला 15 महिन्यांचा कालावधी उरला असताना वणगा यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीचीही तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. ही निवडणूक काँग्रेसने गंभीर घेतली असून बाकी पक्षांचे मात्र अजूनही तळ्यात मळ्यात आहे. तर भाजपच्या उमेदवारानंतरच भूमिका ठरवण्याचा निर्णय सेनेने घेतला आहे.जिल्ह्यातील प्रभावी राजकीय पक्ष बहुजन विकास आघाडीची अद्याप भूमिका ठरलेली नसून बविआच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

गोंदीया येथील खा. नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या तसेच पालघरमधील जागेसाठी एकाचवेळी पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. ही पोटनिवडणूक भाजप आणि काँग्रेससाठी महत्त्वाची ठरणारी आहे. पालघर हा भाजपाचा बालेकिल्ला असून मोदी लाट देशात कायम आहे हे भाजपाला या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून द्यायचे आहे. या पोटनिवडणुकीचा मोठा परिणाम राज्यातील तात्काळ येणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवरही होणार आहे. त्यामुळे आता भाजप वणगांच्या घरातील सदस्याला उमेदवारी देणार की नवा उमेदवार रिंगणत उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.