Sun, Jan 20, 2019 12:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर, भंडारा-गोंदिया लढतीत प्रचाराचा धडाका

पालघर, भंडारा-गोंदिया लढतीत प्रचाराचा धडाका

Published On: May 20 2018 1:51AM | Last Updated: May 20 2018 1:47AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पालघरमध्ये मित्रपक्ष शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या पुत्राला फोडून उमेदवारी दिली आहे,  तर भंडारा-गोंदियात माजी खासदार नाना पटोले यांनी भाजपवर टीका करीत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. या दोन्ही जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पक्षाची यंत्रणा कामाला लावली असून, शनिवारी भंडारा-गोंदियात जाहीर सभा घेतल्यानंतर रविवारी पालघर मतदारसंघात त्यांची तोफ धडाडणार आहे. 

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी होणार्‍या या दोन्ही पोटनिवडणुका सत्ताधारी भाजप आणि विरोधकांसाठी महत्त्वाच्या आहेत. ही निवडणूक सार्वत्रिक निवडणुकीची चाचणी मानली जाणार आहे. या दोन्ही जागा भाजपच्या असल्याने त्या राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. पालघर लोकसभा मतदार संघात शिवसेनेने निवडणूक लढण्याचा निर्णय घेत चिंतामण वनगा यांच्या मुलालाच फोडल्याने दोन्ही मित्रपक्ष एकमेकांसमोर आले आहेत. शिवसेनेने लोकसभा निवडणुका या स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला असून, पोटनिवडणुकीपासून त्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनेही सर्व ताकद पणाला लावली आहे. माजी राज्यमंत्री व काँग्रेस पक्षातील आदिवासी नेते राजेंद्र गावित यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. भंडारा-गोंदियात मुख्यमंत्र्यांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खा. प्रफुल्ल पटेल आणि माजी खासदार नाना पटोले यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.