Mon, Jun 17, 2019 14:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाकची साखर आता ठाणे, रायगड जिल्ह्यांत

पाकची साखर आता ठाणे, रायगड जिल्ह्यांत

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 15 2018 1:24AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील 

व्यापार्‍यांनी किलोमागे एक ते दीड रुपया नफ्यासाठी पाकिस्तानातून मागवलेली साखर आता ठाणे व रायगड जिल्ह्यात वितरित होत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, सोमवारी दहिसर मोरीमध्ये पाकिस्तानी साखरेच्या गोण्यांनी खचाखच भरलेल्या एका गोदामावर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्‍लाबोल चढवून शेकडो गोण्या मातीत ओतल्या. पुढारीला मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातून साखर आयात करणारा व्यापारी चंदीगडचा असून, सौरभ मल्होत्रा यांच्या सुकमा एक्सपोर्टस लिमिटेड या कंपनीनेच भारतीय शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या जखमांवर पाकची कडू साखर चोळली. 

एपीएमसीत पाकिस्तानातून चंदीगढचे आयातदार सौरभ मल्होत्रा यांनी फेबु्रवारी, मार्चमध्ये 3 हजार मेट्रीक टन साखर मागवून ती  एपीएमसीतील चार बड्या व्यापार्‍यांना पुरवठा केली होती. राज्य सरकारने एपीएमसी आणि शुगर मर्चंट असोसिएशनकडून आता या संदर्भात अहवाल मागवला आहे. एपीएमसी घाऊक बाजारात दोन महिन्यांपूर्वी 12 ट्रक म्हणजे 125 टन पाकिस्तानी साखर आली. ही साखर जेएनपीटीतून थेट व्यापार्‍यांकडे आली होती. ती 2590 ते 2690 रुपये क्विंटल दराने विक्री केली  गेली होती. आजमितीस एपीएमसीत पाकिस्तानी साखरेचा एक दाणाही नाही. मात्र, ठाणे जिल्ह्यातील भिंवडी आणि रायगड जिल्ह्यांतील पनवेलमधील बडे व्यापारी आज ही पाकिस्तानी साखरेची आयात करत असल्याची माहिती शुगर मर्चंटच्या पदाधिकार्‍यांनी पुढारीला सांगितले.

व्यापारी म्हणतात सबसिडीमुळे साखर आयात 

पाकिस्तानने फेबु्रवारीत तेथील साखर मिलला मोठ्या प्रमाणावर सुमारे 19 टक्के सबसिडी दिल्याने पाकिस्तानी साखरेचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले होते. त्यावेळी ती साखर स्वस्त दरात एपीएमसीतील चार व्यापार्‍यांनी आयात कर भरूनच मागवली होती. त्यामुळे व्यापार्‍यांनी कर भरल्याने पाकिस्तानी साखर भारतात मागवली जात असल्याची माहिती सरकारला होती हे यावरून स्पष्ट होते.  भारतात फेबु्रवारीत साखरेचे उत्पादन 250 लाख मेट्रिक टन झाले असताना ही पाकिस्तानी साखर आयात करण्यात आली होती. विशेष म्हणजे भारताला 210 लाख मेट्रिक टन साखरेची आवश्यकता लागते. त्यातुलनेत फेबु्रवारीत झालेले उत्पादन हे 40 लाख मेट्रिक टन अधिक होते. म्हणजेच साखरेचा कुठलाही तुटवडा नव्हता. या व्यापार्‍यांनी 12 ट्रक साखर फेबु्रवारी ते 10 एप्रिल या काळात मागवली होती. ती साखर 25 रुपये 90 पैसे ते 26 रुपये 50 पैसे प्रतिकिलोने दराने घाऊक बाजारात विक्री करण्यात आली. तिचा किरकोळ बाजारातील दर त्यावेळी 30 ते 32 रुपये असल्याचे घाऊक व्यापार्‍यांनी सांगितले.