Responsive image

वारलीचे जनक पद्मश्री जिव्या म्हसे काळाच्या पडद्याआड

Published On: May 16 2018 1:43AM | Last Updated: May 16 2018 1:35AM


डहाणू : वार्ताहर

आदिवासी समाज जीवनाची लयबद्ध चित्रशैली असलेल्या वारली पेंटिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर जगन्मान्यता मिळवून देणारे वारली चित्रकार पद्मश्री जिव्या सोमा म्हसे (87 ) यांचे मंगळवारी (काल) डहाणू तालुक्यातील गंजाड येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि सदाशिव व बाळू ही दोन मुले आहेत. आपल्या कलेतून डहाणूला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून देणार्‍या या कलाकाराच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. जिव्या यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पार्थिवावर कलमीपाडा येथील जुन्या घरी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.     

13 मार्च 1931 रोजी जिव्या सोमा म्हसे यांचा जन्म पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गंजाड, कलमीपाडा येथे झाला. रुढी-परंपरांचा पगडा असलेल्या आणि प्रचंड मागासलेल्या आदिवासी समाजात ते वाढले. मात्र, आदिवासींच्या वारली परंपरेने  त्यांचे आयुष्य पालटले. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यावरील बायका लग्‍नसमारंभात आपल्या घराच्या भिंतींवर वारली चित्रे काढायच्या. तारप्याभोवती फेर धरून होणारा नाच, लग्‍नाचा मांडव, लग्‍नाचा चौक अशा असंख्य चित्रांचे म्हसे यांना लहानपणापासूनच आकर्षण वाटायचे. त्यामुळेच वारली चित्रे फक्‍त सुवासिनींनीच काढायची ही आदिवासींची प्रथा वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी मोडली.

वारली चित्रकलेच्या दुनियेत म्हसे यांनी सुरू केलेली प्रयोगशीलता व नवनिर्मिती अंतापर्यंत सुरूच होती. भारतातील आदिवासी कला जगासमोर याव्यात आणि त्यांच्या कलात्मक वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात एक शोध मोहीम राबवली होती. त्या मोहिमेतील भास्कर कुलकर्णी यांना जिव्या सोमा म्हसे हा अस्सल हिरा सापडला. त्यामुळे वारली चित्र संस्कृतीचेही नशीब पालटले. 

आपली कला सादर करण्यासाठी ते दिल्‍लीत पोहचले. पारंपरिक वारली चित्रांच्या सोबत त्यांनी प्राणी, पक्षी, फुलांनाही वारली चित्रकलेच्या साच्यात खुबीने बसवले. या कलेने प्रभावित होऊन 1976 साली राष्ट्रपती पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.

देशातल्या अनेक कला दालनांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरू लागली. राज्य सरकारच्या मदतीने वारली चित्रकलेच्या प्रसारासाठी त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या. त्यांनी हजारो आदिवासी मुलांना वारली कला शिकवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. त्यांची दोन मुलेही या कलेत पारंगत असून त्यापैकी एक मुलगा वर्षातले तीन महिने जपानच्या म्युझियममध्येच कार्यरत असतो. 

रशिया, इटली, जर्मनी, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम आदी देशांनी म्हसे यांना आपली वारली चित्रशैली दाखवण्यासाठी निमंत्रित केले. त्यांच्या कलेवर बेहद खूश होऊन बेल्जियमच्या राणीने म्हसे यांना 17 लाख रुपये इनाम दिला. जपानच्या मिथिला म्युझियमचे संचालक होसेगवा यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला आहे. 

परदेशात असंख्य मानसन्मान मिळत असताना भारत सरकारने मात्र त्यांची भलतीच उपेक्षा केली. सन 1976 साली तत्कालीन राष्ट्रपती फक्रूद्दिन अली यांनी म्हसे यांना साडेतीन एकर जमीन पुरस्कार स्वरुपात देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांना यासाठी 34 वर्षे सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागले. 2011 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.