Sat, Aug 24, 2019 23:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पद्मावत’ विरोधात देशभर तणाव; शो हाऊसफुल्ल

‘पद्मावत’ विरोधात देशभर तणाव; शो हाऊसफुल्ल

Published On: Jan 25 2018 9:15AM | Last Updated: Jan 25 2018 9:15AMमुंबई : प्रतिनिधी/वृत्तसंस्था

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बहुचर्चित ‘पद्मावत’ रीलिज होण्यास काही तास उरले असताना, या चित्रपटाविरोधातील वातावरण तापू लागले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात राजपूत संघटनांनी देशभर तीव्र आंदोलन उभारले असून, ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळ  सुरू आहे. मुंबई, नाशिकसह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा या राज्यांत करणी सेनेचे समर्थक रस्त्यांवर उतरले आहेत. दिल्ली-जयपूर महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला असून, मथुरेत रेल रोकोचे वृत्त आहे. मुंबईत ‘पद्मावत’विरोधात रस्त्यावर  उतरलेल्या 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अहमदाबादेत 40 वर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘पद्मावत’ला आमचा विरोध कायम असून, हा चित्रपट रीलिज झालाच, तर देशभर कर्फ्यूसद‍ृश स्थिती निर्माण करू, असा इशारा करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्रसिंह कालवी यांनी दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘पद्मावत’ प्रदर्शित होत असलेल्या देशभरातील सर्व चित्रपटगृहांसमोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

देशात अनेक राज्यांतील स्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता केंद्रीय गृह मंत्रालय अ‍ॅलर्ट झाले आहे. गुजरातमध्ये आंदोलन हिंसक होण्याची चिन्हे बघता, येथील गुरुग्राम येथे कलम 144 लागू करण्यात आले आहे. हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथेही हे कलम लागू करण्यात आले आहे. राजस्थानात चित्तोडगड येथे सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हरियाणात ‘पद्मावत’वर अघोषित बंदीसारखी स्थिती आहे.

मुंबईतील 140 थिएटर्सना छावणीचे स्वरूप

गुरुवारपासून मुंबईतल्या 140 चित्रपटगृहांमध्ये ‘पद्मावत’ झळकणार आहे. चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला शनिवारी सुरुवात झाली असून, तिकीट विक्री वेगाने सुरू आहे. सर्वच शो हाऊसफुल्ल बुक झाले आहेत. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस सज्ज झाले असून, त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी चित्रपटगृहांच्या मालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पोलिस विभाग मुंबईत हिंसाचार पसरवू इच्छिणार्‍या कोणत्याही व्यक्‍ती किंवा संस्थेची गय करणार नाही, असे मुंबई पोलिसांच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्‍त देवेन भारती यांनी म्हटले आहे. चित्रपटगृहांना संरक्षण मिळावे, जेणेकरून जर आणीबाणीचा प्रसंग ओढवला, तर त्वरित तो नियंत्रणात आणता येईल, यासाठी चित्रपटगृहांच्या मालकांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे, अशी माहिती चित्रपटमालक आणि वितरक संघटनेचे अध्यक्ष नितीन दातार यांनी दिली आहे.

‘पद्मावत’ला विरोध कायम

‘पद्मावती’ सिनेमाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यात आले, सिनेमातील आक्षेपार्ह भागही वगळण्यात आले. तरीही ‘पद्मावत’ला करणी सेनेचा विरोध कायम आहे. या प्रकरणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवू नये, यासाठी 17 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली असली, तरी प्रत्यक्षात 100 हून अधिक कार्यकर्त्यांची धरपकड केल्याचे समजते.

करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी राज ठाकरेंना काळे फासण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे मनसे व करणी सेना समोरासमोर उभे ठाकण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक आंदोलनांमध्ये आक्रमक असणार्‍या मनसेच्या प्रमुखाला काळे फासण्याचा इशारा दिल्याने मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

‘पद्मावत’ चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संरक्षण दिल्याच्या बातम्या व त्यामध्ये मांडण्यात आलेली भूमिका ही मनसेची अधिकृत भूमिका नाही. चित्रपटाला संरक्षण देण्याची भूमिका पक्षाने घेतलेली नाही, असा खुलासा मनसेचेे नेते व प्रवक्‍ते अविनाश अभ्यंकर यांनी केला आहे. ‘पद्मावत’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. सुप्रीम कोर्टानेही ‘पद्मावत’ चित्रपटाला परवानगी दिलेली असताना, त्या चित्रपटाला विरोध करणे चुकीचे आहे. या चित्रपटाला विरोध करण्यासाठी भारत बंदचे आवाहन करणे हे अत्यंत अयोग्य असल्याचे शालिनी ठाकरे यांनी म्हटले होते.

2,400 रुपयांपर्यंत  विकली गेलीत तिकिटे

‘पद्मावत’ पाहण्यासाठी लोक हजारो रुपये मोजायला तयार आहेत. दिल्लीच्या मल्टिप्लेक्स पीव्हीआरमध्ये प्लॅटिनम सुपीरियरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी 2,400 रुपयांची तिकिटे खरेदी केली, तर प्लॅटिनमसाठी 2,200 रुपये मोजले.