Fri, May 24, 2019 08:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीएनबीचा एफडी टू ओडी घोटाळा!

पीएनबीचा एफडी टू ओडी घोटाळा!

Published On: Mar 05 2018 1:50AM | Last Updated: Mar 05 2018 1:49AMमुंबई : अवधूत खराडे

प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या मामा-भाच्याने पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) अधिकारी आणि कर्मचार्‍यांना हाताशी धरून केलेल्या करोडो रुपयांच्या घोटाळ्याने बँकिंग क्षेत्र हादरले असतानाच चार वर्षांपूर्वी पीएनबीच्या गोरेगाव शाखेमध्ये बँकेच्या अधिकार्‍यांनी ठगांची मदत घेत ‘एफडी-टू-ओडी’ मार्गाने करोडोंचा घोटाळा केल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. या एफडी घोटाळ्याची व्याप्‍ती मोठी असून, पीएनबीसह इतरही अनेक बँकांत व्यक्‍ती व संस्थांनी ठेवलेल्या एफडीचे पैसे ओडीच्या माध्यमातून धनलक्ष्मी बँकेत ज्योती एन्टरप्रायझेसच्या खात्यावर जमा झाल्याचे धक्‍कादायक चित्र आहे. 

विशेष म्हणजे या प्रकरणात आमदारकीची निवडणूक लढविलेल्या एका बड्या महिलेसह पीएनबीच्या अधिकार्‍यांची नावे उघडकीस आली आहेत. परंतु चार वर्षे उलटली तरी यातील एकाही बँक अधिकार्‍याला अजूनही अटक झालेली नाही.

व्यावसायिक सुरेश मित्तल (62) यांची आयुर्वेद प्रचार संस्था असून या संस्थेचे एक कार्यालय नरिमन पॉईंट येथे आहे. 2013 साली आयुष बियानी आणि पवन बियानी या दोन ठगांनी मित्तल यांना गाठले. पीएनबी बँकेच्या गोरेगाव शाखेमध्ये मुदतठेवीत (एफडीमध्ये) गुंतवणूक केल्यास चांगला आर्थिक फायदा होईल आणि बँकेशी चांगले संबंधही निर्माण होतील, असे आमिष या दोघांनी मित्तल यांना दाखविले. मित्तल यांनी ऑगस्ट 2013 मध्ये 2 कोटी 25 लाख आणि 2 कोटी 75 लाख अशा एकूण पाच कोटी रुपयांच्या एफडी

पीएनबी बँकेत काढल्या. आयुर्वेद प्रचार संस्थेचे खाते असलेल्या येस बँकेच्या नरीमन पॉईंट शाखेतून त्यांनी एफडीसाठीच्या या रकमा आरटीजीएसद्वारे पीएनबी बँकेच्या गोरेगाव शाखमध्ये वळती केली. रक्कम जमा होताच अनुक्रमे 23 ऑगस्ट आणि 28 ऑगस्टला नऊ टक्के दराने एका वर्षासाठी गुंतवणूक केलेल्या दोन एफडीच्या पावत्या पीएनबी बँकेकडून कुरीयरद्वारे मित्तल यांना मिळाल्या.

मात्र पवन आणि आयुष याने पीएनबी बँकेचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक विजयसिंह सिरोहा, वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कालरा आणि उप व्यवस्थापक एस. एस. मातेकर यांच्या संगनमताने कट रचून मित्तल यांच्या एफडीवर परस्पर  90 टक्के म्हणजेच साडे चार कोटी रुपयांची ओव्हर ड्राफ्ट फॅसिलीटी घेतली. 

वर्षभराने एफडीची मुदत पुर्ण होऊनही रक्कम न मिळल्याने मित्तल यांनी थेट पोलिसांत धाव घेत  तक्रार दिली. या तक्रारीनुसार बँकेचे अधिकारी व अन्य आरोपींविरोधात 19 नोव्हेंबर 2014 रोजी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि आर्थिक गुन्हे शाखेने  तपास सुरू केला. 

मित्तल यांनी पीएनबीच्या गोरेगाव शाखेत काढलेल्या एफडीमधील रक्कम ओडीच्या माध्यमातून धनलक्ष्मी बँकेच्या गोरेगाव पश्‍चिम शाखेतील ज्योती एंटरप्रायजेस आणि अ‍ॅक्सीस बँकेच्या अंधेरी पश्‍चिमेकडील शाखेतील इंटीग्रेशन टेक्नॉलॉजी प्रा. लि. खात्यात वळती करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. तेथून ही रक्कम अन्य ठगांच्या खात्यात वळती करण्यात आली. अशाप्रकारे अन्य बँकातूनही ज्योती एंटरप्रायझेसमध्ये ओडीच्या रुपात करोडो रुपेय जमा झाल्याचे उघड झाले. याचा अर्थ एफडीतून ओडी घोटाळ्यात फासलेले मित्तल एकटे नसावेत. या ज्योती एंटरप्रायजेसच्या खात्यावर विविध बँकांमधून आलेल्या रकमांची यादी पाहिली म्हणजे या घोटाळ्याची व्याप्ती स्पष्ट झाली. घोटाळ्याचा पैसा ज्योती एंटरप्रायजेसच्या खात्यात आणि तिथून अन्य ठगांच्या खात्यात वळता झाल्याचे स्पष्ट होऊनही गेल्या 4 वर्षांत ज्योती एंटरप्रायझेसचा मालक कोण, हे पोलिसांना समजू शकले नाही.

ज्योती एंटरप्रायजेस आणि अ‍ॅक्सीस बँकेच्या अंधेरी पश्‍चिमेकडील शाखेतील इंटीग्रेशन टेक्नॉलॉजी प्रा. लि. मधून घोटाळेबाज आणि शोमॅन हॉस्पीटॅलीटी प्रा. लि. कंपनीचा संचालक मोहम्मद फसिउद्दीन याच्या खात्यात 80 लाख रुपये रक्कम वळती करण्यात आली. ही रक्कम फसिउद्दीने विधी प्रॉपर्टीज प्रा. लि.च्या बांधकाम व्यवसायात गुंतविल्याचे उघड झाले. फसिउद्दीनच्या विरोधातील पुरावे जप्त करत आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्यासह विमल बरोट याला अटक केली. किल्ला कोर्टात या गुन्ह्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून अटक आरोपींविरोधात खटला सुरू झाला आहे. मात्र याप्रकरणात पीएनबीच्या  बँक अधिकारी- कर्मचार्‍यांवर कुठलीच कारवाई झालेली नाही. 

घोटाळ्याची व्याप्ती अधिक..

दोन अटक आरोपींविरोधात न्यायालयात खटला सुरू असून घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने सीआरपीसी कायद्याच्या कलम 173 (8) अन्वये हा गुन्हा कायम तपासावर ठेवला असल्याचे विशेष सरकारी वकील प्रकाश साळसिंगीकर यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.