मुंबई : पुढारी वृत्तसेवा
पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) तब्बल 11 हजार 300 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी तपास करत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने बँकेच्या मुंबईतील ब्रॅन्डी हाऊस शाखेला सोमवारी टाळे ठोकले. तसेच सीबीआयने याप्रकरणी बँकेच्या चलन विभागातील प्रभारी मुख्यव्यवस्थापक बच्चू तिवारी, याच विभागाचा व्यवस्थापक यशवंत जोशी आणि निर्यात विभागाचा अधिकारी प्रफुल्ल सावंत यांना अटक केली. तिघांच्या अटकेमुळे गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या सहा झाली आहे.
ईडी आणि आयकर विभागाने याचप्रकरणात सोमवारी मुंबईसह ठाणे, पुणे, औरंगाबाद, गुजरात, कलकत्ता, दिल्ली, लखनौ, बेंगलुरू आणि जम्मू अशा 38 ठिकाणी छापेमारी करत मोदी आणि चोक्सी यांची तब्बल 22 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या पाच दिवसांत तब्बल 5 हजार 716 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून हे धाडसत्र सुरुच राहणार असल्याचे इडीने स्पष्ट केले आहे. ईडीच्या या संपुर्ण तपासाची माहिती घेण्याचे ईडीचे प्रमुख संचालक कर्नल सिंग यांनी सोमवारी मुंबईत येऊन संपूर्ण तपासाची माहिती घेतली. ईडी आणि आयकर विभागाने याप्रकरणात सुमारे 200 डमी आणि बनावट कंपन्यांचीही चौकशी सुरू केली आहे.
आरोपी तिवारी याच्यावर शेट्टीच्या कारभारावर देखरेख ठेवण्याची, तर जोशी याच्यावर शेट्टी करत असलेल्या दैनंदीन व्यवहारांवर लक्ष ठेवणे, त्याची तपासणी करण्याची जबाबदारी होती. या दोघांनाही या घोटाळ्याची पूर्वीपासून माहिती असल्याचे तपासात उघड झाले आहे. यादोघांसह सावंतच्या अटकेनंतर सीबीआयने त्यांच्या नवी मुंबई, डोंबिवली आणि अंधेरी येथील घरांवर सीबीआयने सोमवारी छापे टाकले. तसेच नीरव ग्रुपच्या लोअर परळ येथील पेनीन्सूला बिझनेस पार्क येथील कार्यालयावर छापा टाकला आहे.
बँकेचे 4 हजार 886.72 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करत सीबीआयने सुरू केलेल्या तपासाअंती तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी याच्यासह सिंगल विंडो ऑपरेटर मनोज खरात आणि निरव मोदी ग्रुप ऑफ फर्म्सचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता (ऑथराईज्ड सिग्नेटरी) हेमंत भट याना सीबीआयने शनिवारी दुपारी बेड्या ठोकल्या होत्या. या तिघांकडेही सीबीआय कसून चौकशी करत आहे.