Wed, Jul 24, 2019 08:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीएनबीचे खातेदार धास्तावले, ठेवी काढू लागले

पीएनबीचे खातेदार धास्तावले, ठेवी काढू लागले

Published On: Feb 18 2018 9:20AM | Last Updated: Feb 18 2018 9:20AMमुंबई : खलील गिरकर 

पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) साडेअकरा हजार कोटीच्या घोटाळ्यामुळे आपल्या ठेवी धोक्यात आल्याच्या संशयाने विविध बँकांच्या सर्वसामान्य ठेवीदारांंमध्ये धास्ती वाढली आहे. या ठेवीदारांनी आपापल्या ठेवी बँकांतून काढण्याचा सपाटा लावला असून, मोठमोठे घोटाळे समोर येत असल्याने आपल्या ठेवी असुरक्षित झाल्याची भीती ठेवीदारांमध्ये निर्माण झाल्याने बँकांतून ठेवी काढून त्यांना स्थावर मालमत्ता किंवा सोन्यामध्ये गुंतवण्याचा विचार ठेवीदार करू लागले आहेत.

पंजाब नॅशनल बँकेच्या कांदिवलीतील एका शाखेतून शुक्रवारी एकाच दिवशी 85 लाखांच्या ठेवी काढल्या गेल्याचे समजते. बँक बुडण्याचा धोका असल्यास ठेवीदारांच्या ठेवी त्यासाठी वापरण्याची तरतूद प्रस्तावित एफआरडीए कायद्यात असल्याने व सहकारी बँकांच्या प्रकरणात ही तरतूद सध्या वापरली जात असल्याने ठेवीदारांनी सुरक्षित मार्ग म्हणून आपल्या ठेवी काढण्याचा मार्ग पत्करल्याचे स्पष्ट झाले आहे. 

एकीकडे भयभीत ठेवीदारांनी पीएनबीतील पैसे काढून घेणे सुरू केले असले तरी ही दुसर्‍या क्रमांकाची राष्ट्रीयीकृत बँक असून, ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नसल्याचे मत बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

तज्ज्ञांचा सल्‍ला

बँक कर्मचार्‍यांचे नेते विश्‍वास उटगी म्हणाले, पीएनबी ही राष्ट्रीयीकृत बँक असल्याने या घोटाळ्याने ही बँक बुडण्याची अजिबात शक्य नाही. मुळात अनेक सहकारी व खासगी बँका बुडण्याची वेळ आल्यावर त्यांना राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विलीन केले जाण्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे या घोटाळ्यामुळे ठेवीदारांनी ठेवी काढण्याची गरज नाही. कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेवर अशा प्रकारे संकट आल्यावर बँक बुडत नाही. तसेच, ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढून घेतल्या तर पैसे सुरक्षित ठिकाणी कुठे ठेवायचे हा देखील प्रश्‍न उपस्थित होतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. बँक कर्मचार्‍यांचे नेते देविदास तुळजापूरकर यांनी देखील ठेवीदारांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रीयीकृत बँकांना बुडण्याचा धोका नसून या बँकांना सरकारची हमी असल्याने त्या बँका बुडणार नाहीत. राष्ट्रीयीकृत बँकेतील ठेवीदारांचा एकही रूपया बुडणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली. राष्ट्रीयीकृत बँकांच्या मागे सरकार उभे आहे हीच हमी आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची गरज नाही असे त्यांनी स्पष्ट केले.