Wed, Jul 08, 2020 19:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीएमसी बँक खातेदारांचे न्यायालयाबाहेर धरणे

पीएमसी बँक खातेदारांचे न्यायालयाबाहेर धरणे

Last Updated: Oct 17 2019 1:08AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत 4 हजार 355 कोटींच्या कर्जघोटाळ्यामुळे खातेदारांची आर्थिक कोंडी झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 हजार कोटी रुपयांचे बेलआउट पॅकेज जाहीर करावे अशी मागणी खातेदारांनी बुधवारी केली. या मागणीची दखल न घेतल्यास विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ चा पर्याय वापरण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

पीएमसी बँकेत अडकलेल्या पैशांची चिंता असह्य होऊन मुंबईत आतापर्यंत तिघांचे बळी गेले. यामुळे खातेदार अधिकच  अस्वस्थ झाले आहेत. बँक घोटाळ्यातील एचडीआयएलचे चेअरमन राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग तसेच बँकेचे माजी अध्यक्ष वरयाम सिंह यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता किल्ला कोर्टाबाहेर बँकेच्या खातेदारांनी धरणे आंदोलन केले. रिझर्व्ह बँकेच्या विरोधात  निदर्शने करत बँकेत असलेला पैसा त्वरित मिळावा, अशी मागणी केली. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासोबत आंदोलकांची बैठक झाली. बँकेत झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी  यावेळी दिले. 

बँक संचालकांची 4 हजार 500 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, त्यातून बँकेच्या ग्राहकांना दिलासा मिळेल, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिल्याची माहिती एका खातेदाराने या वेळी दिली.