Sun, Jul 12, 2020 20:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गांधी घराण्याची खुर्ची जाणार म्हटले, की देश धोक्यात येतो : PM मोदी 

गांधी घराण्याची खुर्ची जाणार म्हटले, की देश धोक्यात येतो : PM मोदी 

Published On: Jun 26 2018 12:02PM | Last Updated: Jun 26 2018 2:14PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

देशात 43 वर्षांपूर्वी लादण्यात आलेल्या आणीबाणीवर मुंबईत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला. सत्तेसाठी काँग्रेसने संपूर्ण देशाचा कारागृह केला होता. तसेच जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि गांधी घराण्याची खुर्ची जाणार असे वाटू लागले तेव्हा तेव्हा देश धोक्यात येतो अशी ओरड केली जाते, अशी टीका PM मोदींनी केली.

आणीबाणीचा दिवस आम्ही काँग्रेसच्या विरोधासाठी नव्हे तर लोकशाहीत अलर्ट राहण्यासाठी साजरा करतो. एका कुटुंबासाठी संपूर्ण न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्यात आला होता. काँग्रेसमुळेच न्यायव्यवस्था धोक्यात आली होती. आज ही काँग्रेस याच मानसिकतेत आहे. न्यायव्यवस्थेला भिती घालण्यासाठी महाभियोगाचा वापर केल्याचे  PM मोदींनी सांगितले.  

किशोर कुमार यांना देखील सोडले नाही

आणीबाणीच्या काळात पार्श्वगायक किशोर कुमार यांनी काँग्रेसचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे रेडिओवरून त्यांची गाणी हद्दपार करण्यात आली होती. इतक नव्हे तर आणीबाणीनंतर अनेक वर्षांनी आलेल्या ‘आंधी’ चित्रपटाला देखील काँग्रेस घाबरली होती आणि त्यावर बंदी घातली होती. ज्या पक्षात लोकशाही नाही त्याच्याकडून लोकशाहीसाठीच्या आस्थेची अपेक्षा कशी काय करायची, असा सवाल PM मोदींनी केला.

तहानलेल्याला पाण्याची किंमत

देशातील आजच्या युवकांनी आणीबाणी अनुभवली नाही. त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल फार माहिती नाही. याबद्दल कितीही सांगितले तरी त्यांच्या मनात आणीबाणीबद्दल राग निर्माण होणार नाही. ज्या व्यक्तीला तहान लागलेली असते, त्यालाच पाण्याची खरी किमत असते. देशातील जनतेने कधी विचार देखील केला नसेल की सत्तेसाठी आणि एका कुटुंबाच्या फायद्यासाठी संपूर्ण देशाचा कारागृह केला जाईल, असे PM मोदी म्हणाले.

मुस्लिम समाजात भीती तयार केली

PM मोदींनी आरोप केला की, काँग्रेसने लोकांच्या मनात भिती तयार केली की भाजप सत्तेत आल्यास मुस्लिमांची हत्या केली जाईल, दलितांच्या अडचणी वाढतील. पण ज्यांनी लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली तेच आता मोदी संविधान नष्ट करत आहेत असे जगाला ओरडून सांगत आहेत. 

EVMवरून काँग्रेसचा समाचार

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका आणि ईव्हीएम मशिनवर घेतले जाणारे आक्षेप यावरून देखील मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला. एकेकाळी काँग्रेसच्या लोकसभेत 400 जागा होत्या आता त्या 44 वर आल्या आहेत. कर्नाटकमध्ये विजय मिळवल्यानंतर काँग्रेसने ईव्हीएममधील दोषांवर काहीच टीका केली नसल्याचे PM मोदींनी सांगितले.