Sat, Aug 24, 2019 18:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉग : नौटंकीबाजांनो लाज वाटू द्या लाज !

ब्लॉग : नौटंकीबाजांनो लाज वाटू द्या लाज !

Published On: Apr 17 2018 10:45AM | Last Updated: Apr 17 2018 10:46AMब्लॉगर : दत्तकुमार खंडागळे 

परवा अर्थसंकल्पीय अधिवेशन निष्फळ ठरल्याचे कारण सांगत सत्ताधारी पक्षाने आत्मक्लेश म्हणूण उपोषण केले. देशाचे प्रधानमंत्री, सत्ताधारी पक्षाचे सर्व खासदार, आमदार व कार्यकर्ते सगळे उपोषणाला बसले होते. हा प्रकार पाहून हसावं की रडावं ? असा प्रश्न पडला. हा सगळा प्रकार नौटंकीतला होता. खरेतर या नौटंकीबाजांना लाजा वाटल्या पाहिजेत.  आज देशात शेतकरी, व्यापारी, छोटे छोटे व्यवसायिक हे सगळेच अडचणीत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगार रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत, देशात सामाजिक द्वेषाचे वातावरण कमालीचे तीव्र झाले आहे. हे वातावरण यापुर्वी देशात कधीच नव्हते. देशातला सत्ताधारी नौटंकीबाज, दांभिक आणि कुटील कधीच नव्हता. भरकटलेले, विस्कटलेले, दिशाहीन, कोणताही कार्यक्रम नसलेले, प्रतिमा नसलेले व विश्वासाहर्ता नसलेले विरोधकही कधीच नव्हते. इतके दर्जाहिन व दिशाहिन राजकारण देशाच्या वाट्याला आजवर आले नव्हते. 

सरकारवाले फारच बनेल आणि नौटंकीबाज तर विरोधक उथळ-पुथळ आहेत. या उपोषणाधी राहूल गांधींनीही उपोषण केले. त्यांनी दलितांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रश्नाबाबत उपोषण केले. लगेच भाजपवाल्यांनीही उपोषण केले. मागे नोटबंदीच्या काळातही सत्ताधारी आणि विरोधकांच्या नौटंकीचा प्रत्यय देशाला आला होता. राहूल गांधी चार हजार रूपयांसाठी बँकेच्या रांगेत उभे राहिले होते. तर दुसरीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आई बँकेतून पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या होत्या. हे दोन्हीं नेते अवघ्या देशाला मुर्खात काढतायत. "देशातली जनता मुर्ख आहे, तिला काही कळत नाही, आपली ढोंगं बेमालूमपणे तिला पटते" असा या यांचा समज झालेला दिसतोय. राहूल गांधी विरोधक आहेत. भारतात सत्तेसाठी विरोधक नौटंक्या करतो. हा इतिहास आहे पण सत्ताधाऱ्यांनीही नौटंकी करावी  हे विशेष. कदाचित सातत्याने विरोधात राहून नौटंकीबाजी सत्ताधाऱ्यांच्या अंगात मुरली असावी.

मोदींना आत्मक्लेश करायचाच होता तर स्वत:च्या करंटेपणाचा करायला हवा होता. सत्तेवर येताना त्यांनी लोकांना अच्छे दिनाची स्वप्ने दाखवली. भुलभुलैय्या निर्माण केला. कोट्यवधी रूपये ओतून, दिशाभूल प्रचार तंत्राचा अवलंब करत लोकांच्या अपेक्षा वाढवल्या. या देशातल्या प्रत्येक प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे नरेंद्र मोदीच असा प्रचार केला. साठ वर्षात जे घडले नाही ते (सिर्फ साठ दिन) साठ दिवसात करण्याचे वचन दिले. वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याची हमी दिली, परदेशातला काळा पैसा आणूण प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर पंधरा-पंधरा लाख रूपये जमा करु, शेतकऱ्यांचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करुन त्यांच्या मालाला दिडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले. गत सरकारातल्या सर्व भ्रष्टाचाऱ्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. अशी अनेक आश्वासने दिली गेली. 

गेल्या तीन-साडेतीन वर्षात या सरकारने काय दिवे लावले ? दिलेल्या आश्वासनातले काय काय केले ? हे अवघ्या देशाला ठाऊक आहे. सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. सत्तेवर येण्यापुर्वी 'सबका साथ सबका विकास' अशी घोषणा दिली होती. सत्तेवर आल्यावर 'सिर्फ भाजपवालोंका विकास बाकी सब देसवासी बकवास' हा अजेंडा सुरू आहे. सध्या देशात उत्तरप्रदेशातले व काश्मिरमधले बलात्कार प्रकरण गाजते आहे. या दोन्ही प्रकरणात सत्तेच्या वळचणीची गिधाडं आहेत. त्यांना मोदींची सत्ता सुरक्षा देतेय. त्यांच्या बाजूने उभी राहतेय. अशा स्थितीत विद्यमान सरकार विरोधकांच्याकडे बोट दाखवत आत्मक्लेश करतेच कसे ? खरे तर सरकारने स्वत:च्याच नालायकीचा आत्मक्लेश करायला हवा होता. सरकार चालवण्यासाठी आपण निकम्मे ठरलो, कायदा-व्यवस्था राखण्यातही यश आले नाही. शिवाय दिलेली आश्वासने पाळण्यास असमर्थ ठरलो, याची लाजेपायी सरकारने आत्मक्लेश करायला पाहिजे होता.

काश्मिर  आणि उत्तरप्रदेशमधील बलात्काराच्या घटनेची लाजखातर मोदींनी आत्मक्लेश करायला हवा होता. पण ढोंगाड्या राज्यकर्त्यांना आत्मक्लेश करायचा नाही. स्तोम माजवायचे आहे, ढोंग वटवायचे आहे. आपणच निकम्मे आहोत हे कबूल करायचं नाही. स्वत:चे नाकर्तेपण लपवून विरोधकांच्या आड दडायचे आहे. स्वत: निपुत्रिक असल्यावर त्यासाठी शेजाऱ्याला दोष देऊन काय साध्य होणार आहे ? दोष शेजाऱ्याचा की स्वत:चा ? याचे चिंतन सरकारने करण्याची गरज आहे. पंतप्रधान आज ज्या संसदेच्या वाया गेलेल्या वेळेसाठी उपोषण करत आहेत. तेच पंतप्रधान संसदेच्या कामकाजात कितीवेळा भाग घेतात ? बऱ्याचदा ते स्वत:च्या कार्यलयात बसतात पण संसदेच्या कामकाजाला उपस्थित राहत नाहीत. हे चित्र असताना नेमकी आत्मक्लेशाची नौटंकी कशासाठी ? नथूरामच्या वारसदारांना ही नौटंकी शोभत नाही. मनात नथूराम लपवायचा आणि आव गांधीचा आणायचा हा दुटप्पीपणा बरा नव्हे. सरकारवाल्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. युपीत मुलीवर झालेल्या बलात्काराची तक्रार करायला गेलेल्या पिडितेच्या बापालाच तुरूंगात टाकले. त्याला तुरूंगातच जीवे मारले.

बलात्कार झालेली मुलगी हिंदू, बाप हिंदू आणि सरकार हिंदूत्वाच्या मसिहांचे. विशेष म्हणजे अंगावर भगवी घालणारा मुख्यमंत्री आहे. काश्मिरमध्ये आठ वर्षाच्या मुलीवर मंदिरात आळीपाळीने बलात्कार होतो. आरोपीला वाचवण्यासाठी भाजपाचे दोन आमदार तिरंगा यात्रा काढतात. असल्या हरामखोरांच्या समर्थनार्थ तिरंगा यात्रा काढावी हा तिरंग्याचा अपमान आहे. भक्त मंडळी इतिसातल्या मुस्लिम शासकांनी केलेल्या बलात्कारांची आठवण करून देत या नालायकीचे समर्थन करतात. भक्तांच्या आई-बहिणीवर असा प्रसंग ओढवला असता तर भक्त काय म्हणाले असते ? अशा स्थितीत संसदेच्या कामकाजाबाबत उपोषणाची नौटंकी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना स्वत:च्या कोडगेपणाची लाज वाटत नाही हे विशेष. 

ज्यावेळी भाजपा विरोधात होती तेव्हा भाजपाने संसद किती चालून दिली ? हा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारायला हवा. २००४ ते २००९ या काळात भाजपाच्या गदारोळामुळे ६२ टक्के कामकाज होवू शकले नाही. तीच तऱ्हा  युपीएच्या दुसऱ्या टर्मला. तब्बल ६१ टक्के कामकाज व संसदेचा वेळ या लोकांनी वाया घालवला. ६६ टक्के प्रश्न तासही त्यांनी वाया घालवले. परिणामी अधिवेशनावर कोट्यवधीचा खर्च होऊन देखील कामकाज शून्य अशी परिस्थिती निर्माण झाली.   विशेष म्हणजे आज हेच संसदेच्या कामकाजासाठी आत्मक्लेश करतायत. सरकारचे हे उपोषण म्हणजे माळकरी झालेल्या बोक्याचा उपवास आणि पाण्यात माशावर डोळा ठेवून बगळ्याने लावलेले बक ध्यान या सारखेच आहे. त्यांचा असा समज झालाय की देश आपल्या ढोंगबाजीला बळी पडतोय. आपण काही केले तरी खपतेय, लोकांना पटतय. परवाचे आत्मक्लेश उपोषण हे सत्ताधार्यांनी स्वत:च्याच नाकर्तेपणाची दिलेली कबूली आहे. हे मात्र नक्की. देशातली सद्यस्थिती पाहून सत्ताधारी खरोखर प्रामाणिक व संवेदनशिल असते तर त्यांनी आत्मक्लेश न करता आत्महत्या केली असती.
 

Tags :  PM Narendra Modi, Opposition Leader, Rahul Gandhi, Doing Drama,Parliament Session