Fri, Apr 26, 2019 15:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बैलगाडाचालकांकडून पेटाची राज यांच्याकडे तक्रार

बैलगाडाचालकांकडून पेटाची राज यांच्याकडे तक्रार

Published On: Mar 03 2018 1:46AM | Last Updated: Mar 03 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी

बैलगाडा शर्यतींना सतत विरोध करुन शर्यतीवर बंदी आणणार्‍या पेटा या विदेशी संस्थेबाबत गुरुवारी अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यासमोर मुंबईत कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेऊन पेटा बाबतच्या तक्रारीचा पाढा वाचला.

पेटा प्राणी कल्याणाचे काम करत असल्याचे भासवत असली तरी प्रत्यक्षात मात्र समाजाची दिशाभूल करणारी व विदेशातून पैसा मिळवण्यासाठी सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने काम करणारी संस्था आहे. पेटा या संस्थेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर व आंतरराष्ट्रीय न्यायालयात विविध स्वरुपाच्या तक्रारी व गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती या संघटनेने दिली. 

पेटा वर बंदी घालण्याची मागणी करत बैलगाडा मालकांना न्याय मिळवुन देण्याची मागणी केली. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून असंख्य देशी गोवंशाचे शेतकर्‍याकडून आपोआप जतन संवर्धन केले जाते. शर्यत बंदी मुळे बैलांची संख्या कमी झाल्याचे पशु गणनेच्या आकडेवारी वरुन निदर्शनास आल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

या बाबत बैलगाडा मालकांसोबत मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन चर्चा करु, असे सांगितले. देशात बैलांना कापायला बंदी नाही अन शर्यतीसाठी पळवायला मात्र बंदी आहे यावर आश्चर्य व्यक्त करत आपण शर्यतीचा प्रश्न सोडवू, यासाठी शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असे आश्‍वासन राज ठाकरे यांनी संघटनेला दिले.

पेटा संस्थेवर बंदी घालावी या मागणीसाठी 13 मार्च 2018 पासुन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेने बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील बैलगाडामालक बैलांसह या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही बैलगाड्याच्या न्यायालयीन प्रकरणाची सद्यस्थिती जाणून घेतली. मनसे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, पुणे जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी तसेच अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे राज्यातील पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.