Sun, Jun 16, 2019 12:29
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात तब्बल अडीच कोटींहून अधिक बाल कामगार

राज्यात तब्बल अडीच कोटींहून अधिक बाल कामगार

Published On: May 01 2018 1:36AM | Last Updated: May 01 2018 1:33AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

नागरी आणि ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या वाढत असल्याचा दावा सरकार करत असले तरी प्रत्यक्षात राज्यात सुमारे अडीच कोटींहून अधिक बाल कामगार आहेत. 2001 आणि 2011 च्या जनगणनेवर आधारीत क्राय या बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेने आपल्या अहवालात ही माहिती नमुद केली आहे. राज्यातील असंख्य बालके विविध उद्योगांमध्ये काम करत आहेत. 2011 मधील जनगणनेवरून क्रायने बालकांचे औद्योगिक विभाजन केले आहे. विविध राज्यांमध्ये शेती, वन, मासेमारी, बांधकाम, ऑटोमोबाइल्स व उत्पादन अशा

उद्योगांमध्ये असंख्य बालके काम करत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रामधील 18 वर्षे व त्याखालील अडीच कोटी बालके काम करत आहेत. बालकामगारांचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या पाच राज्यांपैकी महाराष्ट्राचा समावेश आहे. 

राज्यात काम करणार्‍या बालकांपैकी 6.8 टक्के बालके शेती, वन व मासेमारी या उद्योगांमध्ये काम करत आहेत. या तुलनेत उत्तर प्रदेश आघाडीवर असून तेथे या उद्योगांत काम करणार्‍या बालकांचे प्रमाण 18.1 टक्के आहे. बांधकाम उद्योगात राज्याचे स्थान पाचवे असून त्यामध्ये काम करणार्‍या बालकांचे प्रमाण 7.4 टक्के आहे, तर उत्पादन क्षेत्रात काम करणार्‍या बालकांचे प्रमाण 5.1 टक्के आहे.
ऑटोमोबाइल्स व मोटरसायकल दुरुस्ती क्षेत्रात काम करणार्‍या बालकांची सर्वाधिक संख्या उत्तरप्रदेश राज्यानंतर महाराष्ट्रात आहे. शाळा सोडण्यास भाग पाडले जाणार्‍या असंख्य बालकांना अनेकदा रस्त्याच्या कडेला असलेली गॅरेजमध्ये स्वस्त कामगार म्हणून काम करावे लागते. 

2011 मधील जनगणनेनुसार देशात 5 ते 14 वर्षे वयोगटामध्ये अंदाजे 10.13 दशलक्ष बालके काम करत आहेत. 2001 मधील जनगणनेच्या तुलनेत बालकामगारांची संख्या अंदाजे 20 टक्के घटली आहे, असे आकडेवारी दर्शवते.  देशभरातील बालकामगारांचे प्रमाण 2001 मधील 5 टक्क्यावरून 2011 मध्ये 3.9 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

शहरी भागात काम करणार्‍या मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा सर्व वयोगटांमध्ये वाढले आहे. ग्रामीण भागात मात्र हा ट्रेंड उलट दिसून येतो. प्रत्येक वयोगटांतील मुलींच्या संख्येमध्ये झालेली वाढ बालकांच्या संख्येत झालेल्या वाढीपेक्षा कमी आहे. देशातील 80 टक्के बालकामगार ग्रामीण भागात एकटवले असल्याचे क्रायचा अहवाल म्हणतो.

Tags : Mumbai, mumbai news, 2.5 crore, child labor,